इंग्लंड दुसऱ्या कसोटीवर पकड घेण्याच्या प्रयत्नात

न्यूझीलंडचा निम्मा संघ ३६ धावांवर तंबूत परतला असताना बी. जे. वॉटलिंग आणि कॉलीन डी ग्रँडहोम या जोडीने संघर्ष केला. वॉटलिंग आणि ग्रँडहोम यांच्या प्रत्येकी अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद १९२ धावांची मजल मारली. इंग्लंडने पहिल्या डावात ३०७ धावा केल्या असून यजमान अजूनही ११५ धावांनी पिछाडीवर आहेत. स्टुअर्ट ब्रॉड (४/३८) आणि जेम्स अँडरसन (२/४३) या जलदगती गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीवर पकड घेण्याची संधी दिली आहे. अंधूक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ सात षटके आधीच थांबवण्यात आला.

इंग्लंडने ८ बाद २९० धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली, परंतु अवघ्या १७ धावांची भर घालून त्याने उर्वरित दोन्ही फलंदाज माघारी परतले. जॉनी बेअरस्टोने १७० चेंडूंत ११ चौकार व १ षटकार लगावत १०१ धावा केल्या. त्याला मार्क वूडने ६२ चेंडूंत ७ चौकार व एक षटकार लगावत ५२ धावांची खेळी करून चांगली साथ दिली.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३०७ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे पाच फलंदाज ३६ धावांवर माघारी परतले. ब्रॉड आणि अँडरसन यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. मात्र वॉटलिंग आणि ग्रँडहोम यांनी सहाव्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी करून यजमानांना पुनरागमनाची संधी दिली. १५१ चेंडूंत ७ चौकारांसह ७२ धावा करणाऱ्या ग्रँडहोमला ब्रॉडने बाद केले आणि ही भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर वॉटलिंगने संयमाने खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो १९६ चेंडूंचा सामना करून १० चौकार आणि १ षटकार लगावत ७७ धावांवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड पहिला डाव : ९६ .५ षटकांत सर्व बाद ३०७ (जॉनी बेअरस्टो १०१, मार्क वूड ५२; टीम साऊदी ६/६२, ट्रेंट बोल्ट ४/८७)

न्यूझीलंड पहिला डाव : ७४.५ षटकांत ६ बाद १९६ (बी. जे. वॉटलिंग खेळत आहे ७७, कॉलीन डी ग्रँडहोम ७२; स्टुअर्ट ब्रॉड ४/३८, जेम्स अँडरसन २/४३).