इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३७५ धावा केल्या होत्या. त्यास प्रत्युत्तर देताना इंग्लंडने ४७६ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २ बाद २४१ धावा करत सामना अनिर्णीत राखला. त्यामुळे न्यूझीलंडने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. न्यूझीलंडच्या केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी शतकी खेळी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. या सामन्यात इंग्लंडच्या फिल्डरने एक इतका सोपा झेल सोडला की गोलंदाजाने चक्क कपाळावर हात मारून घेतला.

सामन्याच्या ४९ व्या षटकात विल्यमसन ६२ तर रॉस टेलर ६३ धावांवर खेळत होता. आर्चरने गोलंदाजीच्या वेगात वैविध्य राखत एक चेंडू टाकला. त्या चेंडूचा नीट अंदाज न आल्याने विल्यमसनने फटका खेळला. तो चेंडू थेट जो डेन्टलीच्या हातात गेला. अतिशय सोपा झेल पकडण्याची संधी त्याच्याकडे होती. पण नेमका तोच झेल त्याने सोडला. झेल खुप सोपा असल्याने झेल सुटेल अशी गोलंदाज आर्चरला अपेक्षा देखील नव्हती. त्यामुळे त्याने चेंडू हवेत खेळाडूच्या दिशेने जात असतानाच आनंद साजरा करायला सुरूवात केली होती, पण नंतर मात्र त्याने चक्क कपाळावर हात मारून घेतला.

दरम्यान, न्यूझीलंडच्या टॉम लॅथम याने १०५ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात न्यूझीलंडने ३७५ धावा केल्या. त्याला रॉस टेलर (५३), बीजे वॉटलिंग (५५) आणि डेरील मिचेल (७३) यांची उत्तम साथ लाभली. प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. डॉम सिब्ली आणि जो डेन्ली यांना अपयश आल्यामुळे इंग्लंडची अवस्था २ बाद २४ अशी झाली होती. पण, रॉरी बर्न्स आणि कर्णधार रूट यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १७३ धावांची भागीदारी केली. रॉरी बर्न्सने २०९ चेंडूंत १०१ धावा केल्या. १५ चौकारांच्या मदतीने त्याने शतक ठोकले.

तो बाद झाल्यावर पुन्हा इंग्लंडचा डाव गडगडला. ऑली पोपने जो रूटच्या साथीने इंग्लंडचा डाव सावरला. पोपने २०२ चेंडूंत ६ चौकारांसह ७५ धावा केल्या. पण त्यानंतर तो बाद झाला. पण, रूट एका बाजूने खेळपट्टीवर तग धरून होता. त्याने ४४१ चेंडूंत २२ चौकार आणि १ षटकार खेचून २२६ धावा कुटल्या. अन्य फलंदाजांना फार चांगली कामगिरी न करता आल्याने इंग्लंडचा पहिला डाव ४७६ धावांवर गडगडला.