08 July 2020

News Flash

इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी मालिका : विल्यम्सन-टेलरमुळे दुसरी कसोटी अनिर्णीत

इंग्लंडच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाची त्यांना छान साथ लाभली. विल्यम्सनला तीन जीवदाने मिळाली.

न्यूझीलंडचा मालिकेत १-० असा विजय; नील वॅगनर मालिकावीर

अखेरच्या दिवशी केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी नाबाद शतके झळकावल्याने पावसाचा फटका बसलेली दुसरी कसोटी न्यूझीलंडला मंगळवारी अनिर्णीत राखता आली. त्यामुळे न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० असा विजय मिळवला आहे.

सामन्याच्या शेवटच्या दिवशी वाटय़ाला आलेली ४१ षटके विल्यम्सन आणि टेलर यांनी निर्धाराने खेळून काढली आणि न्यूझीलंडचा पराभव टाळला. इंग्लंडच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाची त्यांना छान साथ लाभली. विल्यम्सनला तीन जीवदाने मिळाली. परंतु त्याने जो रूटला चौकार ठोकून आपले २१वे शतक साजरे केले, तर टेलरने १९ वे शतक झळकावले.

न्यूझीलंडची दुसऱ्या डावात २ बाद २४१ धावसंख्या झाली असताना मुसळधार पाऊस पडला. विल्यम्सनने २३४ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद १०४ धावा केल्या, तर टेलरने १८६ चेंडूंत ११ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १०५ धावा केल्या.

न्यूझीलंडला ‘एमसीसी’चा खेळभावना पुरस्कार

जुलै महिन्यात झालेल्या ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील वादग्रस्त अंतिम सामना न्यूझीलंडने गमावला होता. या सामन्यात खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करीत क्रिकेटरसिकांची मने जिंकणाऱ्या न्यूझीलंडला मेरीलीबोन क्रिकेट क्लबचा (एमसीसी) प्रतिष्ठेचा ख्रिस्टोफर मार्टिन-जेनकिन्स खेळभावना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अव्वल साखळीतही बरोबरीत सुटला. त्यानंतर वादग्रस्त सीमापार फटक्यांच्या नियमाआधारे विश्वविजेता ठरला होता. त्यामुळे केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ‘एमसीसी’ आणि ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीसीसी) यांच्यातर्फे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या समाप्तीनंतर न्यूझीलंड संघाला सेडन पार्क मैदानावर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

‘‘न्यूझीलंड हेच या पुरस्काराचे योग्य विजेते आहेत. प्रेक्षणीय अंतिम सामन्यातील अत्यंत अवघड प्रसंगात त्यांनी खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले,’’ असे मत ‘एमसीसी’चे अध्यक्ष कुमार संगकारा यांनी पुरस्कार देताना व्यक्त केले.

संक्षिप्त धावफलक

 न्यूझीलंड (पहिला डाव) : ३७५ ’ इंग्लंड (पहिला डाव) : ४७६

न्यूझीलंड (दुसरा डाव) : ७५ षटकांत २ बाद २४१ (केन विल्यम्सन नाबाद १०४, रॉस टेलर नाबाद १०५; सॅम करन १/५६) ’ सामनावीर : जो रूट ’ मालिकावीर : नील वॅगनर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 12:47 am

Web Title: england new zealand test series akp 94 2
Next Stories
1 राज्य शालेय क्रिकेट स्पर्धा : नाशिकच्या मुलांना विजेतेपद
2 मुंबईच्या रणजी संघात अजिंक्य, पृथ्वीचा समावेश
3 बलोन डी ओर फुटबॉल पुरस्कार : विक्रमादित्य मेसी!
Just Now!
X