दीपक जोशी

१२व्या इंडियन प्रीमियर लीगचा चित्तथरारक सामना मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर जिंकून विजय मिळवला. मग स्वतंत्र भारताच्या १९व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यावर भारताचे १७वे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा निवडून आले. या घडामोडींनंतर आता १२व्या विश्वचषकाला प्रारंभ होत आहे. इंग्लंड १९७५, १९७९, १९८३ (सलग तीन वेळा), १९९९ आणि आता २०१९ मध्ये पाचव्यांदा यजमानपद भूषवत आहे. आतापर्यंतच्या १२ विश्वचषकांपैकी नऊ सामन्यांमध्ये यजमानांना पहिला सामना खेळायची संधी मिळाली आहे. १९९६, २००७ आणि २००१मध्ये यजमान संघ पहिला सामना खेळले नव्हते. पहिला सामना खेळण्याचा मान इंग्लंडला सर्वाधिक सहाव्यांदा मिळत आहे. विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दी ओव्हलवर होणार आहे. हे दोन्ही संघ विश्वचषक स्पध्रेत दुर्दैवी मानले जातात. पहिले चार विश्वचषक न खेळलेला व १९९२पासून सात विश्वचषक खेळत चार वेळा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणारा संघ म्हणजे आफ्रिकेचा. इंग्लंडचा संघ १९७५पासून खेळत असला तरी १९७९, १९८७ व १९९२ च्या तिन्ही अंतिम सामन्यात त्यांना जगज्जेतेपदाने हुलकावणी दिली आहे.