भारताविरुद्ध इंग्लंडने दोन सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळविला असला तरी निर्विवाद वर्चस्व गाजविण्यासाठी त्यांच्या कामगिरीत अजूनही सुधारणांची आवश्यकता आहे, असे इंग्लंडचे ज्येष्ठ क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट यांनी येथे सांगितले.
इंग्लंड व भारत यांच्यातील पाचव्या कसोटीस १५ ऑगस्ट रोजी प्रारंभ होत आहे. इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या खेळाडूंबद्दल गौरवोद्गार व्यक्त करीत बॉयकॉट म्हणाले, आमच्या खेळाडूंनी तिसऱ्या व चौथ्या कसोटीत स्पृहणीय कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांना विजय मिळाला आहे. मात्र या कामगिरीबाबत मी समाधानी नाही. द्रुतगती गोलंदाजांपाठोपाठ प्रभाव टाकण्यासाठी मध्यमगती गोलंदाजी, सलामीची फलंदाज सॅम रॉबसन याची अपयशी कामगिरी व उसळत्या गोलंदाजीस समर्थपणे तोंड देणारी फलंदाजी या तीन आघाडय़ांवर आमच्या खेळाडूंनी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ख्रिस वोक्स व ख्रिस जॉर्डन यांनी आपल्या गोलंदाजीतील चुका कशा टाळता येतील यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. इंग्लंडच्या विजयात भारतीय फलंदाजांनी केलेल्या अक्षम्य चुकांचा मोठा वाटा होता हे इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक याने लक्षात घेतले पाहिजे.