ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक लँगर यांची ग्वाही; तिसऱ्या कसोटीला आजपासून प्रारंभ

लीड्स : स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थितीतही जोफ्रा आर्चरच्या उसळणाऱ्या चेंडूंचा आम्ही आत्मविश्वासाने सामना करू, असा निर्धार ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी व्यक्त केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे.

लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आर्चरचा उसळणारा चेंडू मानेला लागल्याने स्मिथला तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. चेंडू फेरफारप्रकरणी एक वर्ष बंदीची शिक्षा भोगणाऱ्या स्मिथने पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत (अनुक्रमे १४४ आणि १४२ धावा) शतके झळकावून शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या कसोटीतही ८० धावांवर असताना दुखापत झाल्यामुळे स्मिथ माघारी परतला; मात्र पुन्हा मैदानावर येत त्याने ९२ धावा केल्या. परंतु दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्यामुळे मार्नस लॅबुशेन हा बदली खेळाडू त्याच्या जागी संघात आला. आर्चरच्या एका चेंडूने लॅबुशेनच्या हॅल्मेटचाही वेध घेतला, परंतु त्याने आत्मविश्वासाने खेळत अर्धशतक साकारले. विश्वविजेत्या आर्चरने कसोटी पदार्पणात पाच बळी घेण्याची किमया साधली.

ऑस्ट्रेलियाकडेही पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश असलेला दर्जेदार वेगवान मारा आहे; परंतु या आव्हानांमुळे लक्ष विचलित न होता, १८ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर प्रथमच अ‍ॅशेस मालिका जिंकण्याचे उद्दिष्ट आम्ही जोपासले आहे, असे लँगर यांनी सांगितले.

इंग्लंडला तिसऱ्या कसोटीतही जेम्स अँडरसनची उणीव तीव्रतेने भासणार आहे. एजबॅस्टनच्या पहिल्या कसोटीत फक्त चार षटके गोलंदाजी केल्यानंतर इंग्लंडच्या सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या अँडरसनला दुखापत झाली. त्यातून तो अद्याप सावरलेला नाही.

*  सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स.