भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान आजपासून दुसरा कसोटी सामना सुरु झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. खरे पाहता हा सामना काल (गुरुवार) सुरु होणार होता. पण कालचा संपूर्ण दिवस हा पावसाच्या व्यत्ययामुळे फुकट गेला. पावसामुळे सामना सुरू होण्यास विलंब झाला असल्याने पहिल्या दिवशी नाणेफेकीआधीच खेळाडूंना लंच ब्रेक घ्यावा लागला होता. त्यानंतर चहापानाची विश्रांतीदेखील घेण्यात आली होती. अखेर काल स्थानिक वेळेनुसार ४ वाजून ४५ मिनिटांनी पहिल्या दिवसाचा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती ICCने दिली होती.

अशा प्रद्धतीने पहिला पूर्ण दिवस वाया जाण्याची लॉर्ड्सवरील ही १७ वर्षांनंतर घडलेली पहिलीच घटना ठरली. इं
ग्लंडचे वातावरण हे खूप नखरेल आहे हे सर्वांना माहिती आहे. तेथे कधी हलक्या सरी कोसळतील हे कोणी सांगू शकत नाही. परंतु मोठा पाऊस पडून पडून लॉर्ड्सच्या मैदानावरचा अख्खा दिवस वाया जाण्याची ही घटना तब्बल १७ वर्षांनी घडली आहे.

२००१मध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याच्यवेळी ही लॉर्ड्स मैदानावरील संपूर्ण दिवस पावसामुळे वाया गेला होता. २४ ऑगस्ट २०१३ नंतर इंग्लंड मधील कसोटी सामन्यात पूर्ण दिवस वाया गेला होता.

पावसामुळे गेली सचिनचीही संधी…

लॉर्ड्सच्या मैदानावरील एक जुनी पद्धत म्हणजे सामना सुरु होण्याच्या अगोदर येथे सामन्याची सुरुवात म्हणून बेल (घंटा) वाजवण्याची प्रथा असते. यावेळी हा मान मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर याला देण्यात आला होता. पण पहिल्या दिवशीचा पूर्ण खेळ हा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे नाणेफेकही झाली नाही. त्यामुळे पावसाने खेळाडूंना मैदानात उतरण्याची आणि सचिनला ‘ती’ ऐतिहासिक बेल वाजवण्याची संधीदेखील दिली नाही.