अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सोडली आहे. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनीसुद्धा शरणागती पत्करली. त्यामुळे पाचव्या अॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवसीच ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. इंग्लंडने दिलेल्या ३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २६३ धावांत संपुष्टात आला.

चहापानाला ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ५ बाद १६७ धावा अशी अवस्था झाली होती. ब्रॉड आणि जॅक लेच यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजून योग्य साथ न मिळाल्यामुळे ऑस्ट्रलियाचा चौथ्या दिवशीच पराभव झाला.

शनिवारच्या ८ बाद ३१३ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडचा दुसरा डाव ३२९ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३९९ धावांचे अशक्यप्राय असे आव्हान उभे ठाकले. लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रॉडने सलामीवीर मार्कस हॅरिस (९) आणि डेव्हिड वॉर्नर (११) यांना झटपट बाद केले. तर भरवशाच्या स्मिथला त्याने २३ धावांवर लेग स्लीपमध्ये उभ्या असलेल्या बेन स्टोक्सकडे झेल देण्यास भाग पाडले. मार्नस लबूशेनही (१४) फारशी चमक दाखवू शकला नाही. ४ बाद ८५ धावांवरून मिचेल मार्श आणि मॅथ्यू वेड यांनी पाचव्या गडय़ासाठी ६३ धावांची भागीदारी रचली. मात्र मार्श लगेच बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला.

पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत स्मिथने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.