इंग्लंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला ३ गडी आणि १२ चेंडू राखून पराभूत केलं. इंग्लंडने मालिका ३-० ने जिंकत पाकिस्तानला क्लीन स्वीप दिला. दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पाकिस्ताननं ५० षटकात ३३१ धावांचा डोंगर रचत इंग्लंडसमोर ३३२ धावांचं आव्हान दिलं होतं. विजय सहज शक्य आहे असं पाकिस्तानच्या फलंदाजीनंतर वाटत होतं. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची दाणादाण उडवली आणि सामना ३ गडी आणि १२ चेंडू राखून जिंकला. या सामन्यात जेम्स विन्सने ९५ चेंडूत १०२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

पाकिस्ताननं दिलेलं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरला तेव्हा १९ धावा असताना मालान बाद झाला. संघाची धावसंख्या ५३ असताना सॉल्ट बाद झाला. मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या जेम्सने डाव सावरला आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याने ९५ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. यात ११ चौकारांचा समावेश आहे. तर तळाच्या लेवीस ग्रेगरीने आक्रमक खेळी करत संघाचा विजय सोपा केला. त्याने ६९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमीची दीड शतकी खेळी वाया गेली.

ODI centuries: बाबर आझमने मोडला हाशिम अमलाचा विक्रम

पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वात महागडं षटक टाकलं. त्याने १० षटकात ७८ धावा दिल्या. त्याला एकही गडी बाद करता आला नाही. हरिस रौफनं ६५ धावा देत ४ गडी बाद केले. तर शदाब खाननं २ आणि हसन अलीने १ गडी बाद केला.