लंडन : इंग्लंडला १९६६मध्ये विश्वचषक जिंकू न देण्यात मोलाची कामगिरी बजावणारे मध्य बचावरक्षक जॅक चार्लटन यांचे शनिवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

‘बिग जॅक’ या नावाने ओळखले जाणाऱ्या चार्लटन यांनी १९६५ ते ७० या कालावधीत ३५ सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांना १९६७ मध्ये इंग्लंडमधील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्काराने गौरवले होते. १९५२ ते १९७३ या कालावधीत त्यांनी लीड्स क्लबचे प्रतिनिधित्व के ले. ७७३ सामने खेळताना त्यांनी आपल्या संघाला लीग जेतेपदासह (१९६९) सर्व देशांतर्गत स्पर्धाची विजेतेपदे मिळवून दिली. त्यांचे भाऊ बॉबी मध्यरक्षक म्हणून जबाबदारी पाहायचे. १९६८च्या युरोपियन चषकात तसेच १९७०च्या विश्वचषक स्पर्धेतही ते इंग्लंडकडून खेळले.

१९६६च्या विश्वचषकाच्या अंतिम फे रीत इंग्लंडने अतिरिक्त वेळेत जर्मनीचा ४-२ असा पराभव के ला. राष्ट्रीय संघाकडून खेळताना चार्लटन यांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. ‘‘प्रामाणिक, इतरांची काळजी घेणारा, लोकांसोबत वेळ घालवणारा अवलिया आणि सद्गृहस्थ अशी ओळख असलेल्या जॅक चार्लटन यांच्या रूपाने आम्ही एक चांगला फुटबॉलपटू गमावला आहे. त्यांच्या जाण्याने इंग्लंड फुटबॉलचे मोठे नुकसान झाले आहे,’’ अशा शब्दांत इंग्लंड फुटबॉल संघाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.