यूरो कप २०२० स्पर्धेला रंग चढू लागला आहे. साखळी फेरीतील सामन्यांचा एक एक करून निकाल लागत आहे. चेक रिपब्लिक विरुद्ध स्कॉटलँड यांच्यात रंगलेल्या सामन्यात चेक रिपब्लिकने बाजी मारली. चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक चिकने दोन गोल झळकावले. या गोलमुळे स्कॉटलँड संघाला सावरण्याचा वेळ मिळाला नाही आणि पराभव स्वीकारावा लागला.

पहिल्या सत्रात चेक रिपब्लिक संघाचा आक्रमपणा दिसून आला. ४२ व्या मिनिटाला पॅट्रिक चिकनं गोल करत संघाला एका गोलची आघाडी मिळवून दिली. त्याच्या गोलने स्कॉटलँड संघला दडपणाखाली आणलं. दुसऱ्या सत्रात गोल करून बरोबरी साधण्याचं आव्हान स्कॉटलँड संघासमोर होतं. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. दुसऱ्या सत्रातही चेक रिपब्लिक संघ आक्रमकपणे खेळत राहिला. त्यामुळे आधीच दडपणाखाली असलेल्या स्कॉटलँड संघाची दमछाक झाली आहे. दुसऱ्या सत्रात आणखी एक गोल करत चेक रिपब्लिकने स्कॉटलँडवर २-० ने आघाडी मिळवली आहे. ५२ व्या मिनिटाला पॅट्रिक चिकने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल झळकावला.

या विजयानंतर चेक रिपब्लिक संघासमोर इंग्लंड आणि क्रोएशिया या दोन तगड्या संघाचं आव्हान असणार आहे. स्कॉटलँडने या सामन्यासाठी ३-५-२ अशी व्यूहरचना आखली होती. तर चेक रिपब्लिक ४-२-३-१ या रणनितीसह मैदानात उतरला होता.

चेक रिपब्लिक आणि स्कॉटलँड संघाला बाद फेरीत पोहोचण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. स्कॉटलँडवर २ गोलने विजय मिळवल्यानंतर ‘ड’ गटातील गुणतालिकेत चेक रिपब्लिकचा संघ आघाडीवर पोहोचला आहे. त्याखालोखाल इंग्लंडचा संघ आहे. त्यानंतर क्रोएशिया आणि स्कॉटलँडचा क्रमांक आहे.