यूरो कप २०२० स्पर्धेतील तिसरा सामना डेन्मार्क आणि फिनलँडमध्ये सुरु असताना फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन मैदानात कोसळला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. घटनेनंतर डेन्मार्कच्या खेळाडूंनी क्षणाचाही विचार न करता त्याच्याकडे धाव घेतली. आपला संघ मित्राला काय झालं? याबाबत त्यांच्या मनात धाकधूक सुरु होती. खेळाडूंनी तात्काळ त्याच्याभोवती रिंगण करून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मैदानात उपस्थित असलेली वैद्यकीय टीम तिथे पोहोचली. त्यांनी ख्रिश्चियनला तपासलं आणि तात्काळ रुग्णालयात हलवलं. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं निष्पन्न झालं. मात्र त्याची प्रकृती आता स्थिर असून सुधारणा होत असल्याचं डेन्मार्क फुटबॉल समितीने सांगितलं आहे.

“आम्ही त्याच्या संपर्कात आहोत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे लवकर बरा होईल”, असं डेन्मार्क फुटबॉल समितीचे संपर्क अधिकारी जकॉब होयर यांनी सांगितलं.

फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर आणि इतर सहा जणांची चौकशी सुरु

डेन्मार्कचा खेळाडू ख्रिश्चियन एरिक्सन मैदानावर कोसळल्यानंतर सामना स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर एरिक्सनची प्रकृती ठीक असल्याचे समोर आले आणि सामना पुन्हा सुरू झाला. यात स्पर्धेतील नवख्या फिनलँडने बलाढ्य डेन्मार्कचा १-० पराभव करून इतिहासात नाव कोरले. फिनलँड प्रथमच प्रमुख आणि मोठ्या स्पर्धेत खेळत आहे.