यूरो कप २०२० स्पर्धेत आज स्कॉटलँड आणि चेक रिपब्लिक संघ आमनेसामने असणार आहेत. ‘ड’ गटातील हा दुसरा सामना आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. स्कॉटलँडने मागच्या काही फुटबॉल स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला असणार आहे. तर चेक रिपब्लिक स्कॉटलँडला पराभूत करण्याच्या मानसिकतेनेच मैदानात उतरणार आहे. या गटात इंग्लंड आणि क्रोएशियासारखे तगडे संघ आहेत. त्यामुळे बाद फेरीत पोहोचण्यासाठी या दोन्ही संघांना विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. ग्लासगोतील हॅम्पडेन मैदानात हा सामना रंगणार आहे

फिफा क्रमवारीत स्कॉटलँडचा संघ ४४ व्या स्थानावर, तर चेक रिपब्लिकचा संघ ४० व्या स्थानावर आहे. स्कॉटलँडचा विश्वचषक आणि यूरो कप या दोन मोठ्या स्पर्धेतील ११ वा सामना आहे. स्कॉटलँडने गेल्या नोव्हेंबरमध्ये सर्बियाविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात विजय मिळवल्यानंतर यूरो २०२० स्पर्धेसाठी पात्र झाला होता.

चेक रिपब्लिक संघाने मागे खेळलेल्या पाच सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव, तर सामना बरोबरीत सुटला आहे. सराव सामन्यात इटलीकडून ४-० ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर अल्बनिया संघाला ३-१ ने पराभूत केलं होतं. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचा चेक रिपब्लिकचा प्रयत्न असणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्या. साडे सहा वाजता हा सामना असणार आहे.