यूरो कप स्पर्धेतील साखळी फेरीतील तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. या फेरीमधून बाद फेरीचं सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. सध्यातरी इटली, बेल्जियम आणि नेदरलँड संघाचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे आता एक एक गुंता सुटत जाणार आहे. त्यामुळे बाद फेरीसाठी जर तरची लढाई सुरु होणार आहे. आज साखळी फेरीतील ‘अ’ गटाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. इटली विरुद्ध वेल्स आणि स्वित्झर्लंड विरुद्ध टर्की असा सामना रंगणार आहे. त्यामुळे या गटातून दुसरा कोणत्या संघाला संधी मिळणार याकडे लक्ष लागून आहे. वेल्सला बाद फेरी पोहचण्यासाठी आजचा सामना जिंकणं गरजेचं आहे. जर सामना गमवला आणि स्वित्झर्लंडने टर्की विरुद्धचा सामना जिंकला. तर मात्र गुणांवरून बाद फेरीचं चित्र स्पष्ट होईल.

इटली विरुद्ध वेल्स

साखळी फेरीतील दोन्ही सामने इटलीने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात टर्कीला ३-० ने, तर दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंड ३-० ने पराभूत केलं आहे. त्यामुळे वेल्स विरुद्धच्या सामन्यात इटलीचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. दुसरीकडे वेल्सने आतापर्य़ंत खेळलेले दोन सामन्यांपैकी एक सामना बरोबरीत, एक सामना जिंकला आहे. स्वित्झर्लंड विरुद्धचा सामना १-१ ने बरोबरीत सुटला होता. तर टर्कीला २-० ने पराभूत केलं होतं. त्यामुळे बाद फेरीत पोहोचण्यासाठी वेल्सला हा सामना जिंकणं गरजेचं आहे.

स्वित्झर्लंड विरुद्ध टर्की

स्वित्झर्लंडचं बाद फेरीतील अस्तित्व जर तर अवलंबून आहे. वेल्सने इटलीविरुद्धचा सामना गमावला आणि स्वित्झर्लंडने टर्कीविरुद्धचा सामना जिंकला. तर बाद फेरीत जाण्याचं गणित गुणतालिकेतील गुणांवर असेल. यापूर्वी वेल्स आणि स्वित्झर्लंडचा सामना बरोबरीत सुटला होता. तर इटलीने स्वित्झर्लंडला ३-० ने पराभूत केलं होतं. दुसरीकडे टर्कीचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. वेल्स आणि इटलीने टर्कीला पराभूत केल्याने आजचा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत टर्कीने एकही गोल केलेला नाही. इटलीकडून ३-० ने, तर वेल्सकडून २-० ने पराभव सहन करावा लागला आहे.