सायकलिंग क्षेत्रात संयम, चिकाटी व कठोर परिश्रमाची सत्त्वपरीक्षा घेणारी शर्यत म्हणून टूर-डी-फ्रान्स शर्यतीस आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेचे स्थान आहे. टेनिसमध्ये ज्याप्रमाणे विम्बल्डन स्पर्धेस अनन्यसाधारण महत्त्व आहे, तद्वत या शर्यतीस प्रतिष्ठा आहे. इतिहासातील शंभरावी टूर-डी-फ्रान्स शर्यत जिंकण्याची किमया इंग्लंडच्या ख्रिस्तोफर फ्रूम याने केली.
ही शर्यत तब्बल २१ दिवसांची असून त्यामध्ये स्पर्धकाला तीन हजारपेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापावे लागते. जणुकाही सायकलपटूला एक प्रकारे सायकलवरून क्रॉसकंट्रीच करावी लागते. त्यातही शर्यतीचा मार्ग फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, स्वित्र्झलड, स्पेन, इटली आदी देशांमधून जात असल्यामुळे प्रत्येक देशातील विभिन्न हवामान, रस्ते, लोकांचा प्रतिसाद या पाश्र्वभूमीवर स्पर्धकांच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची कसोटी ठरते. या शर्यतीत विजेतेपद मिळवायचे असेल तर उत्तेजक औषधांचा उपयोग अनिवार्य आहे, असे ही शर्यत सात वेळाजिंकणाऱ्या लान्स आर्मस्ट्राँगने नुकतेच विधान केले होते. उत्तेजक सेवनाच्या आरोपांची कबुली केल्यामुळे त्याने ही सर्व विजेतेपदे गमावली. पण त्याने केलेल्या विधानाचा मथितार्थ लक्षात घेतला तर खरोखरीच ही शर्यत म्हणजे खेळाडूंची अग्निपरीक्षाच ठरत असते.  
  फ्रूम याने शर्यतीमधील एकूण २१ टप्प्यांपैकी तेरा टप्प्यांमध्ये आघाडी राखली होती. त्याने या शर्यतीचे २१०० मैलांचे अंतर ८३ तास ५६ मिनिटांमध्ये पार केले. त्याने दुसऱ्या क्रमांकाचा स्पर्धक नायरो क्विन्टाना याला चार मिनिटे २० सेकंदांच्या फरकाने मागे टाकले. २००५ मध्ये आर्मस्ट्राँगने इव्हान ब्रासो याला चार मिनिटे ४० सेकंदांच्या फरकाने हरविले होते. या शर्यतीमधील एकुणात विजेता होण्यासाठी कमालीचे नियोजन आवश्यक असते. फ्रूम याने त्या दृष्टीनेच सुरेख नियोजन राखले होते. प्रत्येक टप्प्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचे ध्येय न ठेवता प्रत्येक टप्प्यात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये कसे स्थान घेता येईल हाच विचार त्याने केला आणि त्यानुसार सायकलिंग केले. या शर्यतीत अनेक ठिकाणी अतिशय खडी चढाई असल्यामुळे या मार्गावर सायकलिंग करताना दमछाक होण्याची शक्यता असते व त्याचा परिणाम नंतरच्या टप्प्यातील कामगिरीवर होतो हे लक्षात घेऊनच फ्रूम याने वेगात सातत्य राखण्याचा प्रयत्न केला. पठारावरील मार्गात अधिक वेग ठेवायचा आणि त्यामध्ये राखलेली ऊर्जा चढाईवरील टप्प्याकरिता राखीव ठेवायची, हे तंत्र त्याने वापरले.
गतवर्षी इंग्लंडच्या ब्रॅडली व्हिजिन्सने ही शर्यत जिंकली होती. तसेच त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदकही जिंकले होते. त्यामुळे फ्रूम याच्यावरही दडपण आले होते. त्याच्यासमोर अलबर्ट कोन्टाडोर, क्विन्टाना, रोमन क्रुझीगर आदी तुल्यबळ खेळाडूंचे आव्हान होते. मात्र त्यांची फिकीर न करता फ्रूम याने आपणच आपले प्रतिस्पर्धी आहोत, असे मानून त्याप्रमाणे सायकलिंग केले.
फ्रूम याच्यावर उत्तेजक औषधसेवनाचेही आरोप झाले. मात्र त्याने या आरोपांकडे दुर्लक्ष केले. या आरोपांचा कोणताही परिणाम आपल्या कामगिरीवर होणार नाही याची काळजीही त्याने घेतली. गेली सात वर्षे आपण या क्षेत्रात आहोत आणि आपली प्रतिमा स्वच्छ असल्यामुळे या आरोपांकडे लक्ष न देता त्याने फक्त आपल्या सायकलिंगवर लक्ष केंद्रित केले. प्रसारमाध्यमांनी त्याच्यावर अनेक वेळा प्रश्नांची सरबत्ती केली, मात्र त्याने प्रत्येक वेळी आपला तो प्रांत नाही असेच दाखवून दिले.
फ्रूमच्या या यशात त्याचा स्काय या संघाचाही महत्त्वाचा वाटा आहे. प्रत्येक दिवसाचे नियोजन त्याला करून देत त्यांनी त्याचे मनावरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला. अतिशय मृदू भाषा लाभलेल्या फ्रूमने ही शर्यत जिंकल्यानंतरही आपल्या कारकिर्दीची ही सुरुवात असल्याचे सांगितले. त्याला अजून बरीच कारकीर्द या खेळात करावयाची आहे हेच त्याने या विधानाने सूचक केले आहे. या शर्यतीत वर्चस्व गाजविण्याचे त्याचे ध्येय आहे. त्यामध्ये तो यशस्वी होईल अशी आशा आहे.