टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या एका ट्वीटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ”माझा फोन शॉवरमध्ये पडला आहे. तुम्ही माझ्याशी ९११२०८३३१९ वर बोलू शकता, जोपर्यंत तो ठीक होत नाही”, असे ट्वीट सेहवागने केले. सेहवागचे हे ट्वीट पाहून चाहते हैराण झाले, कारण कोणत्याही सेलिब्रिटीने त्याचा नंबर सोशल मीडियावर पोस्ट केला नव्हता. सेहवागचे ट्विटर अकाऊंट हॅक असल्याच्या प्रतिक्रियाही समोर आल्या.

अनेक चाहत्यांनी सेहवागच्या नंबरवर फोन केला आणि लोकांनी त्याचे स्क्रीनशॉट देखील पोस्ट केले. हा नंबर डायल केल्यावर वीरेंद्र सेहवागचे नाव समोर येत आहे. हा खरोखर सेहवागचा नंबर आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही चाहते सेहवागचा हा फोन नंबर डीकोड करत आहेत. तर काहींना या नंबरमध्ये काही रहस्य असल्याचा विश्वास आहे.

 

हेही वाचा – लव्हलिनानं ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकताच गावात रस्त्याचं काम सुरू; तातडीनं प्रशासन लागलं कामाला

सेहवागच्या फोन नंबरच्या शेवटी ३१९ हा क्रमांक आहे. ३१९ ही सेहवागच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर फोन नंबरच्या मध्यभागी ८३ अंक आहे. हा क्रमांक १९८३च्या वर्ल्डकपमधून घेतला असावा, असे काहींनी म्हटले. सेहवागने हे ट्वीट जाणूनबुजून केले आणि तो लवकरच या ट्वीटचे रहस्य सर्वांसमोर आणेल, असेही काही नेटिझन्सना वाटत आहे.

 

 

 

 

सेहवागची क्रिकेट कारकीर्द

आपल्या १४ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये सेहवागने १०४ कसोटी सामन्यांमध्ये ४९.४२ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या, यामध्ये २३ शतकांसहित ३२ अर्धशतकांचा सहभाग होता. पाकिस्तानविरोधात त्रिशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला होता. पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना मुलतानमधील सामन्यात त्याने ३१९ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला ‘मुलतान के सुलतान’ अशी उपाधीही चाहत्यांनी दिली होती.

२५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये सेहवागने ८२७३ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये १५ शतकांसह ३८ अर्धशतकांचा सहभाग होता. भारताच्या दोन विश्वविजयांमध्ये सेहवागचा सहभाग होता.