विश्वनाथन आनंद व मॅग्नस कार्लसन यांच्यातील विश्वविजेतेपदाच्या लढतीचे नॉर्वेसह संयुक्तरीत्या भारताने आयोजन करावे, हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा (फिडे) प्रस्ताव भारताकडून फेटाळण्यात आला आहे. ही लढत चेन्नई येथे नोव्हेंबर २०१३ मध्ये आयोजित केली जाणार आहे. ही लढत चेन्नई येथे आयोजित करण्यास युरोपातील अनेक बुद्धिबळ तज्ज्ञांनी विरोध दर्शविला आहे. ही लढत त्रयस्थ ठिकाणी घ्यावी, असेही त्यांनी सुचविले आहे. यापूर्वी आनंद व व्हॅसेलीन टोपालोव्ह यांच्यातील लढत त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे ‘फिडे’नेच ही लढत त्रयस्थ ठिकाणी घेण्याबाबत फारशी अनुकूलता दर्शविली नाही.
आनंद व कार्लसन यांच्यातील लढत आयोजित करण्याबाबत चेन्नईपेक्षा पॅरिसने अधिक जास्त बोलीचा प्रस्ताव सादर केला होता, मात्र ‘फिडे’ने पॅरिसचा प्रस्ताव मान्य न करता चेन्नईला प्राधान्य दिले आहे. २०१२मध्ये विश्वविजेतेपदाची लढत मॉस्को शहरात आयोजित करण्यात  आली होती. त्यामुळेच यंदा चेन्नईची विनंती मान्य करण्यात आल्याचे ‘फिडे’ने कळविले आहे.
दरम्यान, चेन्नईतील लढतीबाबत कार्लसन व त्याच्या सहकाऱ्यांनी फिडेच्या पदाधिकाऱ्यांपुढे आपल्या शंकांबाबत तपशील मांडला होता, त्या शंकांचे ‘फिडे’ने सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
 ‘फिडे’ने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘‘यापूर्वी त्रयस्थ ठिकाणी अशा लढती आयोजित करताना तसेच प्रायोजक मिळविताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच लढतीमधील स्पर्धकांच्या देशात आयोजन करण्याबाबत प्राधान्य देण्यात येत आहे. तामिळनाडूने चेन्नईतील लढतीकरिता संपूर्ण प्रायोजकत्व स्वीकारले असल्यामुळेच भारताकडे संयोजनपद देण्यात आले आहे.’’