फिफा फुटबॉल विश्वचषकातील रंगत जशी वाढत जाईल, तशी सट्टेबाजारात जोरदार उलाढाल सुरू होणार आहे. आता बाद फेरीत प्रत्येक खेळाडूला महत्त्व प्राप्त होणार आहे. याचे कारण म्हणजे गोलरक्षकापासून ते गोलकर्ते आणि इतर आघाडीच्या खेळाडूंवर सट्टा लावला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारात ज्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूला महत्त्व असते तसेच भारतीय सट्टाबाजारातही तसा सट्टा घेतला जाऊ लागला आहे. इटलीच्या फुटबॉलपटूला चावा घेणाऱ्या लुइस सुवारेझची आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारातून हकालपट्टी झाली आहे. लिओनेल मेस्सी, थॉमस म्युलर हे गोलकर्ते आपली आघाडी टिकवून आहेत. बाद फेरीतील पहिल्या सामन्यात ब्राझील आणि चिली यांपैकी अर्थातच ब्राझीलला सट्टेबाजांनी अनुकूलता दाखविली आहे. हा सामना निर्णायक ठरणार असल्यामुळे त्यासाठी त्यांनी खूपच चांगला भाव दिला आहे. दुसऱ्या सामन्यात उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू निलंबित झाल्यानंतर भावही बदलला आहे. याआधी या सामन्यासाठी कोलंबिया आणि उरुग्वेला सट्टेबाजांनी जवळपास समान भाव दिला होता. आता मात्र कोलंबियाच्या दिशेने पारडे झुकल्याचे दिसत आहे.
आजचा भाव :
ब्राझील     चिली
६० पैसे (३/५)     साडेतीन रुपये (११/२)
कोलंबिया    उरुग्वे
९० पैसे (२०/१९)    तीन रुपये (१६/५)
निषाद अंधेरीवाला

ब्राझीलची ‘हवाई रणनीती’
बेलो हॉरिझोंटे : ‘युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असते’ असे म्हटले जाते. यजमान ब्राझीलने या उक्तीला जागत विश्वविजेतेपदाच्या महासंग्रामात आगेकूच करण्यासाठी छुपी ‘हवाई रणनीती’ अवलंबली आहे. साखळी गटाचा अडथळा पार केल्यानंतर ब्राझीलसमोर तुल्यबळ चिलीचे आव्हान आहे. चिलीचे डावपेच कळावेत यासाठी ब्राझीलच्या एका वृत्तवाहिनीने हेलिकॉप्टरद्वारे चिलीच्या संघाचा सराव टिपण्याचा प्रयत्न केला. चिली संघाचे प्रवक्ते हेक्टर ओलेव्ह यांनी हेलिकॉप्टरनिशी अवतरलेल्या ‘ओ ग्लोबो’ वाहिनीला या घटनेचे प्रक्षेपण करण्यास मनाई केली. चिलीच्या संघाचे डावपेच कळू नयेत, या दृष्टीने त्यांनी ही सूचना केली. ‘ग्लोबो’ वाहिनीने नंतर क्षमा मागितल्याचे ओलेव्ह यांनी सांगितले. ‘‘ब्राझीलसारख्या मजबूत संघाविरुद्ध लढण्यासाठी चिलीचे प्रशिक्षक जोर्ग सॅम्पोली यांनी काही विशेष योजना आखल्या होत्या. त्या प्रतिस्पध्र्याना कळू नयेत हाच आमचा उद्देश होता. आमच्या सरावावर नजर ठेवणारे हे हेलिकॉप्टर जमिनीपासून फार उंचीवर नव्हते. आम्ही सगळ्यांनी ते हेलिकॉप्टर पाहिले, काही खेळाडूंनी रागाने चेंडू हेलिकॉप्टरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्नही केला,’’ असे चिलीचा बचावपटू मॉरिसिओ यांनी सांगितले.
दिन दिन दिवाळी..
फिफा विश्वचषकात अल्जेरियाने बाद फेरी गाठण्याची किमया साधली आणि देशवासीयांनी आगळी दिवाळी साजरी केली. सामना संपल्यावर अल्जेरियाच्या रस्त्यांवर नागरिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष साजरा केला.