लंडनमध्ये पार पडत असलेल्या महिला हॉकी विश्वचषकादरम्यान काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने घातलेला गोंधळ चांगलाच चर्चेत आला होता. महिला कर्णधारांच्या फोटोशूटदरम्यान भारताच्या तिरंग्यावर अशोकचक्रच गायब करण्यात आलं होतं. या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय क्रीडाप्रेमींनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. थेम्स नदीच्या किनाऱ्यावर या विश्वचषकातील कर्णधारांचं फोटोशूट करण्यात आलं होतं.

या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. “आयोजकांकडून भारताच्या झेंडा लावत असताना झालेली चूक लक्षात आल्यानंतर आम्ही तात्काळ त्यांना भारताचा योग्य झेंडा लावण्याचे आदेश दिले होते. आमच्या चुकीमुळे भारतीय चाहत्यांना त्रास झालेला असल्यामुळे या चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.” आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रवक्त्याने संघटनेची बाजू स्पष्ट केली.

महिला विश्वचषकाच्या सलामीच्या स्पर्धेत भारतीय संघाचा सलामीचा सामना यजमान इंग्लंडशी होणार आहे. ‘‘इंग्लंड संघावर दडपण असेल, आमच्यावर नसेल. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा इंग्लंडला जरूर होईल. परंतु प्रतिस्पध्र्याच्या मैदानावरील प्रेक्षकांच्या साक्षीने खेळणे आमच्यासाठी मुळीच नवे नाही. इंग्लंडविरुद्ध याआधीसुद्धा आम्ही चांगली कामगिरी केली आहे. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गटसाखळीमध्ये आम्ही इंग्लंडला हरवले होते. त्यामुळे या सामन्याकडे आम्ही आत्मविश्वासाने पाहात आहोत,’’ असे भारताची कर्णधार राणीने सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हटले आहे.