ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेविषयी बुधवारी अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आज होणाऱ्या बैठकीत विश्वचषकाच्या आयोजनाबरोबरच ‘आयसीसी’च्या कार्याध्यक्षपदासाठीच्या निवडप्रक्रियेविषयीही चर्चा केली जाणार आहे.

‘आयसीसी’च्या कार्यकारी मंडळाची ही बहुचर्चित बैठक टेलिकॉन्फरन्सद्वारे होणार आहे. करोनाच्या साथीमुळे ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाणारी विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात येण्याचीच शक्यता सर्वाधिक असून विश्वचषक लांबणीवर पडल्यास इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) होण्याची शक्यता बळावली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स यांनी विश्वचषकाचे आयोजन नियोजित वेळापत्रकानुसार होणे अशक्य असल्याचे मत, काही आठवडय़ांपूर्वीच व्यक्त केले होते. परंतु ‘आयसीसी’ने मे महिन्याच्या अखेरीस होणारी बैठक १० जूनपर्यंत लांबणीवर टाकली. त्यामुळे एकीकडे टोक्यो ऑलिम्पिक, विम्बल्डन खुली टेनिस यांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्यात आलेल्या असताना विश्वचषकाविषयी बुधवारी तरी अंतिम निर्णय घेण्यात येणार का, हे पाहणे रंजक ठरेल. विश्वचषकाच्या आयोजनाबाबत ‘आयसीसी’कडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये भारतासह पुढील वर्षांच्या विश्वचषकाच्या यजमानपदाची अदलाबदली करण्याबरोबरच थेट २०२२मध्ये विश्वचषक आयोजित करण्याचाही समावेश आहे.

दुसरीकडे शशांक मनोहर यांचा ‘आयसीसी’च्या कार्याध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे. ‘आयसीसी’च्या बैठकीत निवडप्रक्रियेबरोबरच करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि त्यावरील उपाय यासंबंधीही गांभीर्याने चर्चा करण्यात येणार आहे.

‘आयसीसी’ने अधिक दिरंगाई करू नये -धुमाळ

नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वचषकासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात ‘आयसीसी’ने आता अधिक वेळ दवडू नये, अशी स्पष्ट प्रतिक्रिया ‘बीसीसीआय’चे खजिनदार अरुण धुमाळ यांनी व्यक्त केली.

‘‘आयसीसी’च्या कार्यात आम्हाला हस्तक्षेप करण्याचा हक्क नसला तरी त्यांनी विश्वचषकाविषयी अंतिम निर्णय घेण्यात दिरंगाई करू नये, असे मला वाटते. विश्वचषक या वर्षी होणार आहे की नाही, हे स्पष्ट झाल्यावरच ‘बीसीसीआय’ ‘आयपीएल’च्या आयोजनाचा विचार करेल. त्याशिवाय ‘बीसीसीआय’बरोबरच अन्य क्रिकेट मंडळेही आगामी योजना आखण्याविषयी ‘आयसीसी’च्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत,’’ असे धुमाळ म्हणाले. याव्यतिरिक्त देशातील ठरावीक क्रीडा संकुले आता सरावासाठी खुली करण्यात आली असली तरी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच ‘बीसीसीआय’च्या करारबद्ध क्रिकेटपटूंना अधिकृतपणे सरावाला प्रारंभ करण्याची मुभा देण्यात येईल, असेही धुमाळ यांनी सांगितले.

आशिया चषकाविषयीचा निर्णय तूर्तास लांबणीवर

नवी दिल्ली : आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) या वर्षी रंगणाऱ्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेबाबतचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकला आहे. पाकिस्तानने आशिया चषकाचे आयोजन करण्यास नकार दर्शवल्याचा दावा श्रीलंकन क्रिकेट मंडळाने केला असून आम्ही या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यात तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र ‘एसीसी’ने तूर्तास आशिया चषकाविषयी कोणताही निर्णय घेण्याचे टाळले असल्याचे ‘एसीसी’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. ‘आयसीसी’ने ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत निर्णय घेतल्यावरच ‘एसीसी’ आशिया चषकाविषयी विचार करेल, असे यावरून स्पष्ट होते.