17 December 2017

News Flash

धोनीच्या नेतृत्वाची आज अग्निपरिक्षा

फाजील आत्मविश्वास बाळगल्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचे भारतीय संघाचे कर्णधारपद धोक्यात

मिलिंद ढमढेरे, पुणे | Updated: December 20, 2012 7:48 AM

फाजील आत्मविश्वास बाळगल्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचे भारतीय संघाचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. आता गुरुवारी गहुंजे येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत त्याच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षाच ठरणार आहे. कसोटी मालिका जिंकल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या इंग्लंडने आता भारतीय भूमीवर होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेत धोनीसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे.
गहुंजेच्या सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर होणाऱ्या या पहिल्याच आंतरराष्ट्रीय लढतीबाबत येथील क्रिकेटचाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. इंग्लंडच्या नवोदित खेळाडूंपेक्षा अनुभवाबाबत वरचढ असलेल्या भारतीय संघाकडून त्यांना अव्वल दर्जाच्या कामगिरीची अपेक्षा आहे. फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर चाहत्यांना चाहत्यांना चौकार व षटकारांची अपेक्षा आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात रोहित शर्मा व सुरेश रैना या अष्टपैलू खेळाडूंबरोबरच अंबाती रायुडू या धडाकेबाज फलंदाजाचाही समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेत झालेल्या ट्वेन्ट्ी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शर्माने चमकदार खेळ केला होता. त्याने यंदाच्या रणजी मोसमात सातत्याने
फलंदाजीत चमक दाखविली आहे. संघातील स्थान बळकट करण्यासाठी रैना याला ट्वेन्टी-२०चे सामने उपयुक्त ठरणार आहेत. कसोटी संघातून वगळण्यात आलेला युवराज सिंग यालाही आपली निवड सार्थ करण्यासाठी येथे अष्टपैलूत्व सिद्ध करावे लागणार आहे. सलामीसाठी गौतम गंभीरच्या साथीला अजिंक्य रहाणे याला स्थान मिळाले असून त्याच्यावर मोठी जबाबदारी आली ओहे. कसोटी संघात स्थान मिळूनही अंतिम ११ खेळाडूंमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती.
गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार व परविंदर अवाना यांच्याबरोबच अशोक दिंडा यांच्यावर मध्यमगती गोलंदाजीची जबाबदारी आहे. फिरकीत प्रामुख्याने रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
इंग्लंडला केव्हिन पीटरसन व जोनाथन ट्रॉट यांची अनुपस्थिती जाणवणार आहे. परंतु पीटरसन हा एकहाती सामन्याला कलाटणी देण्याबाबत ओळखला जातो. त्याच्या अनुपस्थितीत फलंदाजीची मोठी जबाबदारी जॉनी बेअरस्टो, जो रूट यांच्यावर आली आहे. इंग्लंडने अ‍ॅलेक्स हेल्स, जोस बटलर, जेड डर्नबॅच, जेम्स ट्रेडवेल, मायकेल लम्ब, डॅनी ब्रिज यांना या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी संघात स्थान दिले आहे. हे खेळाडू इंग्लंडच्या विकास योजनेंतर्गत भविष्यातील संघ बांधण्याच्या दृष्टीने निवडण्यात आले आहेत.
इंग्लंडचे नेतृत्व ईऑन मॉर्गनकडे देण्यात आले आहे. त्याच्या जोडीला टिम ब्रेस्नन, समित पटेल व ल्युक राइट यांच्यावर संघाची विजयी मालिका पुढे ठेवण्याची जबाबदारी आली आहे. कसोटी मालिका जिंकल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले असून सध्याच्या परिस्थितीत इंग्लंडचीच बाजू वरचढ मानली जात आहे. विशेषत: ट्वेन्टी-२० स्वरुपाच्या क्रिकेटमध्ये त्यांचेच खेळाडू जास्त चांगली कामगिरी करू शकतात असे मानले जात आहे.    
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराज सिंग, अंबाती रायुडू, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, अशोक दिंडा, भुवनेश्वरकुमार, अभिमन्यू मिथुन, परविंदर अवाना.
इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेम्स हॅरिस, जॉनी बेअरस्टो, टिम ब्रेस्नन, अ‍ॅलेक्स हेल्स, जोस बटलर, जेड डर्नबॅच, जेम्स ट्रेडवेल, मायकेल लुम्ब, डॅनी ब्रिज, स्टुअर्ट मीकर, समीत पटेल, जो रूट, ल्युक राइट.
सामन्याची वेळ :
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट आणि स्टार स्पोर्ट्स.
सामन्याची वेळ : दुपारी २.२० पासून.    

First Published on December 20, 2012 7:48 am

Web Title: fire examination captancy of dhoni
टॅग Cricket,Dhoni,Sports