आयसीसी युवा क्रिकेट संघात पाच खेळाडूंना स्थान

पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक संघावर हुकमत पाहायला मिळत आहे. आयसीसीने रविवारी जाहीर केलेल्या जागतिक संघामध्ये भारताच्या पाच खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये कर्णधार पृथ्वी शॉ, मनज्योत कालरा, शुबमान गिल, अनुकूल रॉय आणि कमलेश नागरकोटी यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघाने शनिवारी अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियावर ८ विकेट राखून सहज विजय मिळवत विक्रमी चौथ्यांदा युवा विश्वचषक उंचावण्याचा पराक्रम केला. या संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजीत भारतीय खेळाडूंनी आपली छाप पाडली. त्यामुळेच त्यांना जागतिक संघातही स्थान मिळाले. पृथ्वीने स्पर्धेत एकूण २६१ धावा केल्या. अंतिम लढतीत शतक झळकावणाऱ्या मनज्योतने २५२, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या शुबमानने ३७२ धावा केल्या आहेत. डावखुरा फिरकीपटू अनुकूलच्या नावावर १४, तर जलदगती गोलंदाज कमलेशच्या नावावर ९ बळी आहेत.

वेस्ट इंडिजचे माजी जलदगती गोलंदाज इयान बिशप, भारतीय महिला संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा, न्यूझीलंडचे माजी कर्णधार जेफ क्रो, ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांच्या समितीने हा संघ निवडला आहे. दक्षिण आफ्रिकेचा रेनार्ड व्हॅन टोंडरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याने या स्पर्धेत सहा सामन्यांत ३४८ धावा केल्या आहेत. त्यात केनियाविरुद्धच्या १४३ धावांच्या खेळीचा समावेश आहे.

आयसीसी जागतिक युवा संघ (फलंदाजीच्या क्रमवारीनुसार)

पृथ्वी शॉ, मनज्योत कालरा, शुबमान गिल (सर्व भारत), फिन अ‍ॅलेन (न्यूझीलंड), रेनार्ड व्हॅन टोंडर (कर्णधार, दक्षिण आफ्रिका), वँडील माकवेटू (यष्टीरक्षक, दक्षिण आफ्रिका), अनुकूल रॉय, कमलेश नागरकोटी (सर्व भारत), गेरार्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका), क्वैस अहमद (अफगाणिस्तान), शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान). १२वा खेळाडू : अ‍ॅलिक अ‍ॅथनाझे (वेस्ट इंडिज).