आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर ४५ धावांनी दणदणीत विजयी सलामी नोंदवली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ६ बाद १६६ धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशला निर्धारित २० षटकांत ७ बाद १२१ धावाच करता आल्या. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने आशिया चषकातील भारताची ही विजयी सुरूवात संघाचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. बांगलादेशविरुद्धच्या भारताच्या विजयाची पाच कारणे..

१. रोहित शर्माची दमदार खेळी-
शिखर धवन आणि विराट कोहली पहिल्या सहा षटकांच्या आत माघारी परतल्यानंतर रोहितने शेवटच्या षटकापर्यंत मैदानात उभं राहून भारताच्या डावाला सावरले. रोहितने ५५ चेंडूत ८३ धावांची दमदार खेळी साकारली. यात ३ उत्तुंग षटकार आणि ७ खणखणीत चौकारांचा समावेश आहे.

२. हार्दिक पंड्याची फटकेबाजी-
अष्टपैलू हार्दिकने महत्त्वाच्या क्षणी जोरदार फटकेबाजी करून संघाला १५० आकडा गाठून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. हार्दिकने १ दमदार षटकार आणि ४ चौकारांच्या जोरावर केवळ १८ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. गोलंदाजीत हार्दिकने बांगलादेशचा एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवला.

३. नेहराची कमाल-
बांगलादेशसमोर १६७ धावांचे आव्हान उभे केल्यानंतर भारतीय गोलंदाजीचे नेतृत्त्व सांभाळणाऱया आशिष नेहराने भेदक गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना जखडून ठेवले. नेहराने आपल्या चार षटकांत २३ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स घेतल्या.

४. बांगलादेशच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात यश-
केवळ ९७ धावांवर ४ महत्त्वाचे फलंदाज माघारी परतले असताना अखेरच्या षटकांत पुनरागमन करत भारताने १६७ धावांचे आव्हान बांगलादेशसमोर ठेवले होते. मिरपूरच्या स्टेडियमवर हे आव्हान सहजगत्या गाठता येणारे असले तरी भारताच्या गोलंदाजांना सुरूवातीच्या षटकांत बांगलादेशच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात यश आले. नेहरा आणि बुमराहच्या भेदक माऱयामुळे बांगलादेशच्या धावसंख्येला मूरड घालण्यात टीम इंडियाला यश आले.

५. शब्बीर रहमानची विकेट टर्निंग पॉईंट-
बांगलादेशचे सलामीवर स्वस्तात माघारी परतले असतानाही शब्बीर रहमान मात्र चांगल्या फॉर्मात दिसत होता. शब्बीरच्या फटकेबाजीमुळे भारताची डोकेदुखी वाढली होती. अखेर अष्टपैलू हार्दिक पंड्याने शब्बीरची विकेट घेतली. हाच भारताच्या विजयाचा टर्निंग पॉईंट ठरला.