भारतीय संघाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक अशक्यप्राय विजय मिळवले आहेत. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेत खेळलेली निदहास करंडक स्पर्धा आजही क्रिकेट प्रेमींच्या मनात कायम आहे. भारत-बांगलादेश-श्रीलंका अशा तिरंगी मालिकेत, भारताने बांगलादेशवर सनसनाटी विजय मिळवत विजय मिळवला होता. दिनेश कार्तिक हा सामन्याचा हिरो ठरला.

नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोच्या मैदानावर बांगलादेशने शब्बीर रेहमानच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ८ गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून युजवेंद्र चहलने ३ तर जयदेव उनाडकटने २ बळी घेतले. मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना अखेरच्या फळीत भारतीय फलंदाजांच्या हाराकिरी करत सामना जवळपास बांगलादेशला बहाल केला होता. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी मोक्याच्या षटकांमध्ये धावा न केल्यामुळे भारतावर दडपण वाढलं. दिनेश कार्तिक आणि विजय शंकर जोडीने अखेरपर्यंत झुंज सुरु ठेवली होती. सौम्या सरकारच्या अखेरच्या षटकात पाचव्या चेंडूवर विजय शंकर बाद झाला आणि भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी पाच धावांची गरज होती. यावेळी फलंदाजीवर असलेल्या दिनेश कार्तिकने सौम्या सरकारच्या गोलंदाजीवर धडाकेबाज षटकार खेचत बांगलादेशच्या जबड्यातून विजयाचा घास खेचून काढला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावर येत एकच जल्लोष केला.

सलामीच्या फळीत कर्णधार रोहित शर्माने ५६ धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र दिनेश कार्तिकने अखेरपर्यंत दिलेल्या झुंजार लढतीसाठी त्याची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.