न्यूझीलंड दौऱ्यात टी-२० मालिकेत ५-० असा धडाकेबाज मालिका विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाची यानंतरच्या सामन्यांमध्ये मात्र घसरगुंडी उडाली आहे. वन-डे मालिका गमावल्यानंतर, पहिल्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाची त्रेधातिरपीट उडालेली दिसली. वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या तेजतर्रार माऱ्यासमोर भारतीय फलंदाजी पुरती कोलमडली. १० गडी राखत भारतावर मात करत न्यूझीलंडने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : कर्णधार विराट कोहलीने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण…

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा हा पहिला पराभव ठरला आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मते ही गोष्ट फारशी महत्वाची नाहीये. सामना संपल्यानंर विराटने भारतीय संघाच्या पराभवाबद्दल आपलं मत मांडलं. “आम्ही जसं खेळायला हवं होतं तसं खेळलो नाही यात शंकाच नाही. पण काही लोकांना यातून राईचा पर्वत करायचा असेल तर आमचा नाईलाज आहे. आम्ही तसा विचार करत नाही. एका पराभवाने जगाचा अंत होत नाहीये. आमच्यासाठी हा फक्त एक क्रिकेटचा सामना आहे. त्यामुळे हा पराभव विसरुन आम्ही पुढच्या सामन्याचा विचार करणार आहोत.”

अवश्य वाचा – Ind vs NZ : भारताची डोकेदुखी ठरलेल्या जेमिसनचा फलंदाजीतला हा विक्रम माहिती आहे का??

वेलिंग्टन कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी पुरती निराशा केली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त १९१ धावांपर्यंत मजल मारु शकला. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी अवघं ९ धावांचं आव्हान मिळालं. लॅथम आणि ब्लंडल या फलंदाजांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांची औपचारिकता पूर्ण करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा – Ind vs NZ : तो यातूनही मार्ग काढेल; मुंबईकर पृथ्वी शॉची विराटकडून पाठराखण