भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून हटविण्यात आलेल्या डब्ल्यू.व्ही. रमण यांनी बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख राहुल द्रविडला पत्र लिहिले आहे. मला बदनाम करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे हे थांबवावे. प्रशिक्षकपदासाठीचा दावा इतर कारणांमुळे नाकारला गेला असला तर ते चिंताजनक आहे, असे रमण यांनी पत्रात म्हटले.

महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रमेश पोवार

क्रिकेट सल्लागार समितीने रमेश पोवार यांची महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मागील वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केला होता. रमण यांनी पत्रात लिहिले, ”माझा विश्वास आहे की माझ्या कामाच्या कार्यप्रणालीबाबत तुम्हाला वेगवेगळी मते देण्यात आली आहेत. माझ्या उमेदवारीवर त्याचा किती परिणाम झाला याबद्दल बोलणे अप्रामाणिक आहे.”

काय म्हणाले रमण?

रमण म्हणाले, ”या बदनाम करण्याच्या मोहिमेवर बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे, त्यांना कायमचे थांबविणे आवश्यक आहे. आपण किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्यास मी यासाठी तयार आहे. जर माझा अर्ज इतर कोणत्याही कारणास्तव नाकारला गेला असेल, तर त्या निर्णयावर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, परंतु चिंताजनक बाब म्हणजे माझा अर्ज इतर कारणांमुळे नाकारला गेला.”

रमण यांनी आपल्या पत्रात कोणाचेही नाव लिहिले नाही, परंतु ते संघातील स्टार संस्कृतीबद्दल लिहित असल्याचे समजते. ते म्हणाले, ”माझ्या २० वर्षांच्या कोचिंग कारकीर्दीत मी नेहमीच अशी संघ संस्कृती तयार केली आहे, ज्यात संघ प्रथम येतो. कोणताही खेळाडू संघ किंवा खेळापेक्षा मोठा नसतो. आता महिला क्रिकेट वाचवण्याची वेळ तुमच्या सारख्या दोन दिग्गजांवर आली आहे, कारण जर तसे झाले नाही, तर गोष्टी चुकीच्या दिशेने जातील. माझ्याकडे महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी सल्ले आहेत आणि तुमची आवड असेल तर ते तुमच्यासमवेत शेअर करायचे आहे.”