भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सौरव गांगुली लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्याआधी रांचीला जाऊन भारतीय संघातील खेळाडूंची भेट घेत, त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी सौरव गांगुली उत्सुक होता. १९ ऑक्टोबरला हा सामना सुरु होणार आहे. मात्र २० ऑक्टोबरला केरळमध्ये इंडियन सुपर लीगचं उद्घाटन करायचं असल्याने त्याला हा प्लॅन रद्द करावा लागला आहे.

“मला रांचीला जायचं होतं, पण इंडियन सुपर लीगचं उद्घाटन करायचं असल्याने सध्या वेळ उपलब्ध नाही. मी इंडियन सुपर लीगचा चेहरा असून, त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे केरळमध्ये उद्घाटनाला उपस्थित असणार आहे,” असं सौरव गांगुलीने सांगितलं आहे. यानंतर गांगुली मुंबईसाठी रवाना होणार आहे. २३ ऑक्टोबरला मुंबईत बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. यावेळी गांगुलीच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान गांगुलीने आपण बंगाली टीव्ही शो दादागिरी आणि जाहिराती करणं सुरु ठेवणार असल्याचं सांगितलं आहे. “मी बंगाली टीव्ही शो दादागिरी आणि जाहिराती करणं सुरु ठेवणार आहे. इतर सर्व गोष्टी थांबवण्यात आल्या आहेत. समालोचन, लेख लिहिणे तसंच आयपीएल हे सर्व आता थांबवणार आहे,” असं सौरव गांगुलीने सांगितलं आहे.

“मी आधीच दिल्ली कॅपिटल्ससोबत काम करणं थांबवलं असून त्यांना कळवलं आहे. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी येणार आहे. सर्वात आधी अनेक समित्या गठीत करायच्या आहेत,” अशी माहिती सौरव गांगुलीने दिली आहे.