आठवडय़ाची मुलाखत – अंजू बॉबी जॉर्ज, भारताची माजी लांबउडीपटू

सुप्रिया दाबके, लोकसत्ता

मुंबई : ऑलिम्पिकसारख्या स्पर्धामध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक जिंकून देणे हे निश्चित सोपे नाही. त्या दर्जाचा खेळाडू घडवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. भारतासारख्या देशात गुणवान अ‍ॅथलेटिक्स खेळाडू असले तरी अजून जागतिक स्तरावर चमक दाखवण्याकरिता मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे, असे नुकतेच भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या (एएफआय) उपाध्यक्षपदी निवड झालेली माजी लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज यांनी म्हटले आहे.

महासंघाची उपाध्यक्ष म्हणून असणारी आव्हाने, खेलो इंडियासारख्या स्पर्धामुळे गुणवान खेळाडूंची होणारी निवड, टोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य यासारख्या विविध विषयांवर अंजू बॉबी जॉर्ज यांच्याशी केलेली खास बातचीत –

* महासंघाच्या  उपाध्यक्षपदी निवड झालेली तू पहिली महिला ठरलीस. त्याविषयी काय सांगशील?

उपाध्यक्ष झाले असले तरी पहिली खेळाडू असल्याने एक संघ म्हणून संघटनेवर सर्वासोबत काम करायला आवडेल. भारतीय अ‍ॅथलेटिक्सचे आणि अ‍ॅथलेटिक्सपटूंचे नाव जगभरात उंचावण्यासाठी जे शक्य आहे ते करणार आहोत. खेळाडू असल्याने खेळाडूंच्या, प्रशिक्षकांच्या अपेक्षा काय असतात. त्यांना कोणत्या सुविधा गरजेच्या असतात, याची पूर्ण माहिती मला आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि खेळाच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधा पुरवणे यासाठी प्रयत्न करणार आहे.

* मोठय़ा स्पर्धामध्ये आजही अ‍ॅथलेटिक्समधून देशाला पदक बऱ्याच काळापासून नाही. त्याविषयी काय वाटते?

ऑलिम्पिकसारख्या स्पर्धामध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक जिंकून देणे हे निश्चित सोपे नाही. त्या दर्जाचा खेळाडू घडवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. खेळाडू हा एकटा पदक जिंकणारा असला तरी त्याला घडवायला संघटना, प्रशिक्षक, साहाय्यक मार्गदर्शक अशा अनेकांची फळी असते. भारतासारख्या देशात गुणवान अ‍ॅथलेटिक्स खेळाडू असले तरी अजून जागतिक स्तरावर चमक दाखवण्याकरिता मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. या सर्व स्पर्धाची तयारी खेळाडूंनी करणे आवश्यक आहे.

* खेलो इंडिया आणि राष्ट्रीय आंतर-जिल्हा कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धामुळे फायदा कशा प्रकारे होईल असे वाटते?

खेलो इंडियासारख्या स्पर्धाचा उद्देश लहान वयातील गुणवान खेळाडूंना हेरणे हा आहे. क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे या स्पर्धाचे आयोजन होते. या स्पर्धामुळे भविष्यात चांगले खेळाडू देशाला मिळतील. ऑलिम्पिकसारख्या मोठय़ा स्पर्धेत या स्पर्धामधून घडलेले खेळाडू नाव कमावतील यात शंका नाही.