आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात केली. अंबाती रायुडूने चौथ्या क्रमांकावर झळकावलेलं अर्धशतक हे चेन्नईच्या विजयाचं प्रमुख कारण ठरलं. ४८ चेंडूत ७१ धावा करुन रायुडूने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सोशल मीडियावरही अंबाती रायुडूच्या या खेळीचं कौतुक करण्यात आलं. २०१९ विश्वचषकादरम्यान भारतीय संघात चौथ्या क्रमांकाची जागा मिळणार असं वाटत असतानाच रायुडूला डावलण्यात आलं होतं. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजाने, कर्णधाराची हांजी-हांजी न केल्यामुळे रायुडूला संघात जागा नाकारण्यात आल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

“रायुडूला चौथ्या क्रमांकावरुन हटवण्यात आलं आणि यानंतर नवीन फलंदाजाचा शोध सुरु झाला. वन-डे मध्ये रायुडूची सरासरी ५० ची आहे. अनेक चांगल्या चांगल्या खेळाडूंना अशी कामगिरी जमत नाही. ज्यावेळी संघाचा कर्णधार बदलतो, एक खेळाडू नेहमी संघाबाहेर जातो जो कर्णधाराची हांजी-हांजी करत नाही. माझ्यामते रायुडू हा तोच खेळाडू आहे.” Cricbuzz या संकेतस्थळाच्या कार्यक्रमात बोलत असताना जाडेजानं आपलं मत मांडलं. २०१९ विश्वचषकात रायुडूला संधी नाकारण्यात आल्यानंतर भारतीय संघाने विजय शंकर आणि ऋषभ पंत यांना संधी दिली. परंतू त्यांना आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही.

अवश्य वाचा – विश्वचषक संघात रायुडूला स्थान न मिळणं हा भारताचाच तोटा – शेन वॉटसन

आयपीएलमध्ये रायुडूने याआधी मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र मुंबईने काही हंगामापूर्वी त्याला सोडून दिलं, ज्यानंतर चेन्नईच्या संघात त्याला संधी मिळाली. विश्वचषक संघात संधी न मिळालेल्या रायुडूनेही नाराज होऊन निवृत्तीची घोषणा केली.