News Flash

कबड्डीपटूंच्या मदतीसाठी विशेष निधी उभारावा!

‘‘कबड्डी खेळ पुन्हा यशस्वीपणे मैदानावर येण्यासाठी लस आवश्यक आहे

आठवडय़ाची मुलाखत : अशोक शिंदे, माजी कबड्डीपटू, प्रशिक्षक

प्रशांत केणी, लोकसत्ता

मुंबई : करोनामुक्तीनंतरच्या काळात कबड्डीपटूंचा रोजगार कसा टिकेल, हे महत्त्वाचे ठरेल. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमधील कबड्डीपटूंच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने आपत्कालीन निधी उभारावा, अशी सूचना अर्जुन पुरस्कार विजेते माजी कबड्डीपटू आणि प्रशिक्षक अशोक शिंदे यांनी केली आहे.

‘‘कबड्डी खेळ पुन्हा यशस्वीपणे मैदानावर येण्यासाठी लस आवश्यक आहे. करोना साथीमुळे कबड्डी क्षेत्राला गंभीर फटका बसला आहे. या कठीण कालखंडात कबड्डीपटू जगण्यासाठी माझ्यासारखे असंख्य कबड्डीपटू, राजकीय नेते आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मदतीने आर्थिक निधी उभारण्याची आवश्यकता आहे,’’ असे शिंदे यांनी सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर कबड्डीपुढे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत शिंदे यांच्याशी केलेली खास बातचीत-

* करोना साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता?

करोनाचे महासंकट हे अनपेक्षितपणे आलेले आहे. एखाद्या विषाणू संसर्गाने अपरिमित हानी होऊ शकते, असा विचारसुद्धा कोणी केला नव्हता. पण हे घडते आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्राप्रमाणेच सर्वच देशांना विविध पातळ्यांवर त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचे संकट आल्यास त्यावर मात कशी करावी, हा धडाच जणू या परिस्थितीने दिला आहे.

* भारताच्या कबड्डी हंगामाच्या भवितव्याविषयी तुम्ही काय सांगाल?

२०१४पर्यंत पावसाळ्यात कबड्डीपटू तंदुरुस्तीकडे लक्ष द्यायचे किंवा विश्रांती घ्यायचे. पण प्रो कबड्डी लीग वार्षिक वेळापत्रकात आल्यापासून वर्षभर कबड्डीचा हंगाम बहरू लागला. जिल्हा-राज्य-राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धाप्रमाणेच दरवर्षी एखाद-दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धासुद्धा यात असतात. करोनाची साथ नियंत्रणात आल्यास कबड्डीला प्रारंभ करता येईल. पण कबड्डी हा शरीर-संपर्काचा खेळ असल्याने प्राधान्यक्रमात त्याचे स्थान खालचे असेल. करोनाकाळात आवश्यक असलेले सुरक्षित अंतर, मुखपट्टीचा वापर हे कबड्डीच्या मैदानावर अमलात आणणे कठीण आहे. त्यामुळे चालू हंगामाचे भवितव्य अधांतरी आहे.

* सध्या चालू असलेल्या आयपीएलच्या यशानंतर प्रो कबड्डी लीग खेळवता येईल का?

प्रो कबड्डीला प्राधान्य देऊन अन्य स्पर्धाचे वेळापत्रक आखणे चुकीचे ठरेल. त्याऐवजी अन्य स्पर्धाचे वेळापत्रक आखून त्यात प्रो कबड्डीला योग्य स्थान देता येईल. जैव-सुरक्षित वातावरणात प्रो कबड्डी सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यास क्रिकेटप्रमाणे संयुक्त अरब अमिरातीत जाण्याची आवश्यकता नाही. जैव-सुरक्षित वातावरण भारतातही निर्माण करता येईल. पण कबड्डी कोणत्याही स्वरूपात सुरू झाल्यास मला अतिशय आनंद होईल.

* मुंबई-महाराष्ट्रात सर्वाधिक व्यावसायिक आणि स्थानिक संघ आहेत, तशाच विक्रमी स्पर्धाही खेळवल्या जातात. करोनानंतरचा काळ कबड्डीपटूंसाठी किती आव्हानात्मक असेल?

करोनानंतरचे पहिले वर्ष कबड्डीपटूंसाठी खूप आव्हानात्मक असेल. आर्थिक संकटामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धाची संख्या रोडावेल. गेली काही वर्षे व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांमधील कबड्डीपटूंची भरती प्रक्रिया मंदावली आहे. करोनानंतर हे संकट आणखी भीषण रूप धारण करील. शालेय-आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाप्रमाणेच कनिष्ठ, कुमार, आदी वयोगटांच्या कबड्डी स्पर्धाना बरीच प्रतीक्षा करावी लागेल.

* सध्या लांबत असलेल्या टाळेबंदीबाबत कबड्डीपटूंना तुम्ही काय सल्ला द्याल?

बरेचसे कबड्डीपटू या कठीण काळात कोविडयोद्धे म्हणून कार्यरत आहेत. सद्य:स्थितीत कबड्डीपटूंनी व्यायाम करून तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे. माझ्यासह अनेक प्रशिक्षक आपल्या कबड्डीपटूंना रोज ऑनलाइन मार्गदर्शन करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:51 am

Web Title: former kabaddi player and coach ashok shinde interview for loksatta zws 70
Next Stories
1 “विराटनंतर रोहित नाही, ‘हा’ असेल कर्णधार”
2 पुढचं IPL, इंग्लंड दौरा युएईतच?? BCCI आणि UAE क्रिकेट बोर्डात महत्वपूर्ण करार
3 इटालियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचला पुन्हा राग अनावर
Just Now!
X