भारतीय कबड्डी महासंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रक्रियेची तसेच महासंघाचे अध्यक्ष जर्नादनसिंह गेहलोत यांच्या कारभाराची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करावी अशी मागणी अनेक माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी केली आहे.
महासंघाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गेहलोत यांची पत्नी डॉ.मृदुला यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यास आक्षेप घेत माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू गुरुदीपसिंग व अन्य काही खेळाडूंनी ही निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. अनेक खेळाडूंवर डॉ.मृदुला यांची एकमताने निवड होण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोपही गुरुदीप यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, कबड्डी महासंघाच्या कारभारावर गेहलोत कुटुंबीयांनी आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. महासंघाच्या हिशोबाची सार्वजनिक लेखापाल विभागातर्फे तपासणी केली जावी. ही निवडणूक घेताना शासकीय नियमावलींनुसार घेण्यात आलेली नाही. गेहलोत यांनी स्वत:कडे महासंघाची सूत्रे राहावीत यासाठी स्वत:ला तहहयात अध्यक्ष केले आहे.
दरम्यान, अर्जुन पुरस्कार विजेता आशनकुमार व अन्य काही खेळाडूंनी निवडणूक प्रक्रियेस आव्हान देत येथील उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अन्य काही खेळाडूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्रसिंग यांची भेट घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी विनंती केली आहे.