न्यूझीलंडचे माजी जलदगती गोलंदाज एविन चॅटफिल्ड यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एविन चॅटफिल्ड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर ते वेलिंग्टन येथील आपल्या स्थानिक क्रिकेट क्लबकडून खेळत होते. महत्वाची म्हणजे वयाची ६० वर्ष ओलांडल्यानंतरही चॅटफिल्ड यांनी आपलं क्रिकेट सुरु ठेवलं होतं. ‘निनी ओल्ड बॉईज’ या आपल्या स्थानिक संघाकडून चॅटफिल्ड स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत होते.

“कोणालाही माझं बोलणं जरा वेगळं वाटेल, पण माझ्याही स्वतःकडून काही अपेक्षा आहेत. त्या दर्जाचा खेळ मी आता करु शकत नाहीये, यासाठी मी अखेर निवृत्ती स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.” चॅटफिल्ड स्थानिक वृत्तपत्राशी बोलत होते. १९७५ साली आपल्या पदार्पणाच्या सामन्यात चॅडफिल्ड यांना इंग्लंडचे माजी गोलंदाज पिटर लिव्हर यांनी फेकलेला बाऊन्सर लागलेला होता. तरीही शेवटच्या क्रमांकावर फलंदाजी आल्यानंतर चॅडफिल्ड यांनी ४४ धावांची भागीदारी केली होती.

आपल्या स्थानिक क्रिकेट क्लबमधून निवृत्ती स्विकारण्याआधी चॅटफिल्ड त्यांना शतक झळकावण्याची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा अखेर अपुरीच राहिली, स्थानिक क्लबकडून खेळताना ते एकमेव अर्धशतक झळकावू शकले. अखेरच्या सामन्यात चॅटफिल्ड भोपळाही फोडू शकले नाहीत, आपली ही कामगिरी वृत्तपत्रात आली नाही तर आपल्याला अधिक आवडेल असंही चॅडफिल्ड यांनी स्थानिक वृत्तपत्राशी गमतीने बोलत असताना म्हटलं.