ब्रिस्बेनचा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका २-१ ने जिंकणाऱ्या टीम इंडियावर सध्या चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने टीम इंडियाच्या या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे कौतुक केले आहे. रवी शास्त्री यांनी, ज्या पद्धतीने संघाला विजयासाठी प्रोत्साहित केले, त्याबद्दल इंझमामने शास्त्री यांचे कौतुक केले आहे.

फारसा अनुभव गाठीशी नसलेल्या युवा भारतीय संघाने ब्रिस्बेनमध्ये बलाढय ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत बॉर्डर-गावसकर करंडकावर नाव कोरले. भारताचा ब्रिस्बेन मधला हा पहिलाच विजय आहे, तर ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षातील पहिला पराभव ठरला.

आणखी वाचा- अजिंक्यला कांगारुचा केक कापण्यास सांगितलं मात्र…; ही बातमी वाचून तुम्हालाही वाटेल रहाणेचा अभिमान

ऑस्ट्रेलियातील या विजयी कामगिरीबद्दल टीम इंडियातील खेळाडूंवर सोशल मीडियामधून कौतुकाचा वर्षाव होत असला, तरी इंझमामच्या मते रवी शास्त्रींना सुद्धा या विजयाचं तितकचं श्रेय जातं. “एका गोष्टीचा लोक उल्लेख करत नाहीयत, ती म्हणजे रवी शास्त्री. संघाचे संचालक म्हणून त्यांनी सुरुवात केली होती पण ते मुख्य प्रशिक्षक म्हणून परतले. त्यांचा अनुभव आणि त्यांच्याकडे असलेली खेळाची समज याचा भारतीय संघाला आणि खेळाडूंना खूप फायदा झाले असे मला वाटते” असे इंझमामने म्हटले आहे.

“प्रत्येकाने शास्त्रींना खेळताना पाहिले आहे. भारताचे ते एक मोठे आणि कुशल अष्टपैलू खेळाडू होते” असे इंझमाने त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हटले आहे.

नटराजनच्या स्वागताला बग्गी; सेहवागने शेअर केलेला Video बघाच

“समालोचन करताना शास्त्री जे बोलायचे, ते अजून मला आठवते. त्यांच्याकडे खेळाडूंमधील प्रतिभेला हेरण्याची नजर आहे. त्यावरुन खेळाचे किती ज्ञान त्यांच्याकडे आहे, ते लक्षात येते. त्याचीच भारतीय संघाला मदत झाली” असे इंझमाने म्हटले आहे. ब्रिस्बेनमधील संघाच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये शास्त्री यांनी खेळाडूंचे कौतुक करताना त्यांना प्रोत्साहित केले होते. विजयाच्या या क्षणाचा जास्तीत जास्त आनंद घ्या, असे शास्त्री यांनी खेळाडूंना सांगितले.