चाहत्यांनी खचाखच भरलेले स्टेडियम.. आरंभरेषेपासूनच सुरू झालेला अपघातांचा सिलसिला.. डोळ्याचे पाते लवण्याआधीच निघून जाणाऱ्या कार.. धोकादायक आणि अवघड वळणांवर हृदयाचा ठोका चुकवणारे क्षण.. एकमेकांना मागे टाकतानाचा रोमांच.. अशा भारलेल्या वातावरणात रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेलने इंडियन ग्रां. प्रि. जिंकली अन् नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर जमलेल्या चाहत्यांनी अक्षरश: गजर सुरू केला.
६० फेऱ्यांची शर्यत १ तास ३१ मिनिटे १२.१८७ सेकंदांत पूर्ण करत वेटेलने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीत हॅट्ट्रिक साजरी करणाऱ्या वेटेलने सलग चौथ्यांदा विश्वविजेतेपदाचा किताब पटकावला. अशी किमया साधणारा तो जगातील पहिला ड्रायव्हर ठरला. वेटेलने अंतिम रेषा पार केल्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये वेटेल नावाचा गजर सुरू झाला. वेटेलच्या विश्वविजेतेपदाच्या आनंदात भारतीय चाहतेही न्हाऊन निघाले. ढोलताशांच्या गजरात, भांगडा आणि गरब्याच्या तालावर स्टेडियममधील प्रत्येक जण डोलत होता. वेटेलनेही भारतीय चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला हात जोडून मनापासून दाद दिली.
वेटेलचा विश्वविजेतेपदाचा सोहळा साजरा करण्यासाठी फॉम्र्युला-वन चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. खाण्या-पिण्याची, उन्हाची पर्वा न करता सर्वच जण वेगाच्या थराराचा आनंद लुटत होते. कानठळ्या बसवणारा आवाज हे फॉम्र्युला-वनचे ऐश्वर्य. हेच ऐश्वर्य आयुष्यभरासाठी जतन करण्याची आणि वेगाचा रोमांच कॅमेऱ्यात टिपण्यात प्रत्येक जण दंग होता.