अव्वल आघाडीवीर किलियन एम्बाप्पेने ७९व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला क्रोएशियावर गुरुवारी २-१   असा विजय मिळवून दिला. यूएफा नेशन्स लीग फुटबॉलमध्ये फ्रान्सने अग्रस्थानावरील पोर्तुगालला गाठत दुसरे स्थान मिळवले आहे. अँटोनी ग्रिझमनने आठव्या मिनिटाला फ्रान्सला आघाडीवर नेले. पण निकोला व्लासिकने ६४व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे क्रोएशियाने बरोबरी साधली होती.

पोर्तुगालच्या विजयात जोटाचे दोन गोल

ख्रिस्तियानो रोनाल्डोला करोनाची लागण झाल्यानंतरच्या पहिल्या सामन्यात दिओगो जोटाने त्याची उणीव पोर्तुगालला जाणवू दिली नाही. पोर्तुगालने स्वीडनचा ३-० असा पाडाव करत क-गटात अव्वल स्थान प्राप्त केले. बर्नाडरे सिल्वाने २१व्या तर जोटाने ४४व्या आणि ७२व्या गोल करत चमक दाखवली.

इटलीची नेदरलँड्सशी बरोबरी

इटलीने नेदरलँड्सविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करल्याने त्यांची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पोलंडने या गटात बोस्निया आणि हेझ्रेगोव्हिनाचा ३-० असा पाडाव करत अग्रस्थान मिळवले आहे.

बेल्जियमच्या लुकाकू चा ५५वा गोल

रोमेलू लुकाकूच्या दोन गोलच्या बळावर बेल्जियमने आइसलँडचा २-१ असा पराभव केला. आता लुकाकूची गोलसंख्या ५५ इतकी झाली आहे.

इरिक्सनचा ‘शतकी’ गोल

ख्रिस्तियन इरिक्सनने १००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पेनल्टीवर गोल केल्यामुळे डेन्मार्कने इंग्लंडचा १-० असा पराभव केला.

इस्रायल, बेलारूसचेही विजय

इस्रायलने स्लोव्हाकियाला ३-० असे हरवले. ग्रीसला कोसोव्होविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करावी लागली. बेलारूसने कझाकस्तानचे आव्हान २-० असे परतवून लावले.