फेडरर, मेदवेदेव, श्वीऑनटेक दुसऱ्या फेरीत

पॅरिस  : जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका यांनी सोमवारी संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरी गटाची दुसरी फेरी गाठली. त्याशिवाय २० ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर, स्टीफानोस त्सित्सिपास, डॅनिल मेदवेदेव, गतविजेती इगा श्वीऑनटेक, सोफिया केनिन आणि आर्यना सबालेंका यांनीही विजयी सलामी नोंदवली.

रविवारपासून सुरू झालेल्या मुख्य फेरीच्या पहिल्याच दिवशी चौथ्या मानांकित डॉमिनिक थीमला गाशा गुंडाळावा लागला. सोमवारी सहाव्या मानांकित झ्वेरेव्हने सुरुवातीचे दोन सेट गमावल्यामुळे त्याच्यावरही पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की ओढवणार होती. मात्र झ्वेरेव्हने झोकात पुनरागमन करताना जर्मनीच्याच ऑस्कर ऑटेवर ३-६, ३-६, ६-२, ६-२, ६-० अशी सरशी साधली.

अन्य लढतींमध्ये स्वित्र्झलडच्या आठव्या मानांकित फेडररने डेनिस इस्टोमिनला ६-२, ६-४, ६-३ अशी सहज धूळ चारली. रशियाच्या दुसऱ्या मानांकित मेदवेदेवने अलेक्झांडर बबलिकवर ६-३, ६-३, ७-५ अशी मात केली. पाचव्या मानांकित त्सित्सिपासने जेरेमी चॅर्डीवर ७-६ (८-६), ६-३, ६-१ असा विजय मिळवला. जपानच्या अनुभवी केई निशिकोरीने अ‍ॅलेसांड्रो जिआनला ६-४, ६-७ (४-७), ६-३, ४-६, ६-४ असे पाच सेटमध्ये नमवले.

महिला एकेरीत दोन वेळच्या ऑस्ट्रेलियन विजेत्या अझारेंकाने स्वितोना कुझनेत्सोव्हाला ६-४, २-६, ६-३ असे पराभूत केले. अन्य लढतींमध्ये तिसऱ्या मानांकित सबालेंकाने अ‍ॅना कोंजुआला ६-४, ६-३ अशी धूळ चारली. पोलंडच्या आठव्या मानांकित श्वीऑनटेकने काजा जुवानचा ६-०, ७-५ असा धुव्वा उडवला. चौथ्या मानांकित केनिनने जेलेना ओस्तापेन्कोला ६-४, ४-६, ६-३ असे हरवले.

सहावी मानांकित बियांका आंद्रेस्कू आणि १६वी मानांकित किकी बर्टन्स यांना मात्र पराभव पत्करावा लागला. तामरा झिदानसेकने आंद्रेस्कूवर ६-७ (१-७), ७-६ (७-२), ९-७ अशी संघर्षपूर्ण लढतीत मात केली. तर बिगरमानांकित पोलोना हेर्कोगने बर्टन्सवर ६-१, ३-६, ६-४ असे वर्चस्व गाजवून दुसरी फेरी गाठली.

’  वेळ : दुपारी २.३० वा.

* प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २

’  वेळ : दुपारी ३.३० वा.

*  प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १

गतविजेती इगा श्वीऑनटेकने २०व्या वाढदिवशी फ्रेंच स्पर्धेतील सलग आठव्या विजयाची नोंद केली. गतवर्षी तिने सलग सात सामने एकही सेट न गमावता जिंकण्याचा पराक्रम केला.

डॅनिल मेदवेदेवचा लाल मातीवरील हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वीच्या आठ सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागला होता.