गेल्या वर्षी रोमानियाच्या सिमोना हॅलेपला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या अमांडा अ‍ॅनिसिमोव्हाने उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले होते. मात्र १९ वर्षीय अ‍ॅनिसिमोव्हाला सहज पराभूत करत हॅलेपने पराभवाची परतफेड केली. तिसऱ्या मानांकित डॉमिनिक थिम आणि एलिना स्वितोलिना या मानांकितांनी आपापले सामने सहज जिंकत चौथ्या फे रीत मजल मारली.

चौथ्या फेरीत हॅलेपने अ‍ॅनिसिमोव्हाला ६-०, ६-१ असे एका तासाच्या आत नमवले. शुक्रवारच्या दिवसात हॅलेपच्या लढतीकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले होते. गेल्या वर्षी हॅलेपचा पराभव या स्पर्धेत धक्कादायक ठरला होता. मात्र यंदा अग्रमानांकित हॅलेपनेगेल्या वर्षीच्या पराभवातून चांगलाच धडा घेतलेला दिसला. पहिला सेट अवघ्या २३ मिनिटांत जिंकताना तिने एकही गेम गमावला नाही. २५वी मानांकित अ‍ॅनिसिमोव्हाने या स्पर्धेत पहिल्या दोन लढतीत अवघे चार गेम गमावले होते. मात्र हॅलेपविरुद्ध तिच्या असंख्य चुका झाल्या. हॅलेपसमोर चौथ्या फेरीत पोलंडच्या १९ वर्षीय बिगरमानांकित इगा स्वियाटेकचे आव्हान आहे.

पुरुष एकेरीत तिसरा मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने दमदार कामगिरी करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. त्याने नॉर्वेच्या कॅस्पर रुडला ६-४, ६-३, ६-१ असे पराभूत केले. थिम २१ वर्षीय रुडविरुद्ध प्रथमच खेळला. या स्पर्धेत सलग पाचव्यांदा चौथी फेरी गाठणाऱ्या थिमला पहिला सेट जिंकताना थोडीफार झुंज द्यावी लागली होती. मात्र त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये खेळ उंचावला. दुसऱ्या ‘मॅचपॉइंट’वर विजय मिळवत थिमने आगेकूच केली.

तिसरी मानांकित युक्रे नच्या एलिना स्वितोलिनाने चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिने रशियाच्या इकॅटरिना अलेक्झांड्रोव्हाचा ६-४, ७-५ असा पराभव केला. स्वितोलिनाने दोन वेळा फ्रेंच स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली आहे. २७व्या मानांकित अलेक्झांड्रोव्हाने लढतीच्या सुरुवातीला केलेल्या काही चुकांचा फायदा स्विटोलिनाला झाला. अन्य लढतीत स्वियाटेकनेही चौथी फेरी गाठत दमदार कामगिरी पुन्हा सिद्ध केली. तिने युक्रे नच्या युगेनी बुशार्डला ६-३, ६-२ असे पराभूत केले. युवा खेळाडू स्वियाटेकनेही सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत चौथी फेरी गाठली. तिचा गेल्या वर्षी या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत सिमोना हॅलेपकडून पराभव झाला होता. याउलट २०१७ नंतर बुशार्डला ग्रँडस्लॅमची चौथी फेरी गाठता आली होती.

अर्जेटिनाच्या नाडिया पोडरेस्काने चौथी फेरी गाठत स्पर्धेत संस्मरणीय कामगिरी सुरू ठेवली. १३१व्या मानांकित पोडरेस्काने अ‍ॅना कॅरोलिना श्मिड्लोवाला ६-३, ६-२ असे नमवले.

* वेळ : दुपारी २:३० पासून

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २

इटलीचे पाच खेळाडू तिसऱ्या फेरीत

इटलीच्या पाच खेळाडूंनी फ्रे ंच खुल्या स्पर्धेची पुरुष एकेरीतील तिसरी फेरी गाठण्याची ही १९६८ नंतर पहिलीच वेळ ठरली आहे. सातवा मानांकित मॅटेयो बॅरेटिनी हा त्यांच्यातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यासह जॅनिक सिनेर, लॉरेन्झो सॉनेगो, स्टेफानो ट्रॅव्हाग्लिया, मार्को सेकिनाटो या इटलीच्या खेळाडूंनी तिसरी फेरी गाठली आहे. सेकिनाटोने २०१८ मध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठण्यात यश मिळवले होते. ‘‘इटलीचे खेळाडू माझ्यासह चांगली कामगिरी करत आहेत याचा आनंद आहे. आता आम्ही किती यश मिळवतो यावर सारे अवलंबून आहे,’’ असे बॅरेटिनीने सांगितले.

वडिलांनंतर रुड दुसराच खेळाडू

थिमकडून तिसऱ्या फेरीत् पराभूत होणारा प्रतिस्पर्धी २१ वर्षीय कॅस्पर रुडच्या नावावर आगळीवेगळी नोंद झाली आहे. १९९७ नंतर ग्रँडस्लॅमची चौथी फेरी गाठणारा तो नॉर्वेचा दुसराच खेळाडू ठरला. याआधी त्याच्या वडिलांनी म्हणजेच ख्रिस्तियन रुड यांनी १९९७मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत चौथी फेरी गाठली होती. थिमविरुद्ध खेळणाऱ्या कॅस्परला पाहण्यासाठी स्वत: त्याचे वडील आणि प्रशिक्षक ख्रिस्तियन रुड मोजक्या प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते.