समुद्रात उंच लाटांवर स्वार होऊन सर्फिंगचा आनंद लुटण्याची मजा काही निराळीच असते. सर्फिंगचा थरार अनुभवण्यासाठी तुमच्या मनाची देखील तितकीच तयारी असावी लागते. मनात भिती ठेवून सर्फींग करता येत नाही. आगामी काळात अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलीवूडच्या ‘बेवॉच’ चित्रपटात सर्फिंग करताना दिसणार आहे. पण नुकतेच चेन्नईच्या समुद्रात भारताच्या तीन नावाजलेल्या खेळाडूंनी सर्फिंगचा थरार अनुभवला. भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजय, स्कॉशपटू जोशना चिनप्पा आणि महिला दुहेरीतील माजी बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियन अश्विनी पोनप्पा या तीन वेगवेगळ्या खेळातील लोकप्रिय खेळाडूंनी चेन्नईच्या समुद्रात सर्फिंग केले. चेन्नईच्या कोवालम बीचवर सर्फिंगची सुविधा गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर मुरली विजयला येत्या ९ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱया इंग्लंड दौऱयासाठी आराम देण्यात आला होता. त्यामुळे मिळालेल्या फावल्या वेळेत मुरली विजयने समुद्रात सर्फिंग करण्याचा आनंद लुटला. याआधी आयपीएल स्पर्धेवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन आणि द.आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी रोड्स यांनीही चेन्नईच्या समुद्रात सर्फिंग केले होते.
मुरली विजय, अश्विनी पोनप्पा आणि जोशना चिनप्पा यांनी सर्फिंग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात मनसोक्त सर्फिंग केले. मुरली विजयने सर्फिंग केल्यानंतर आपल्या सर्फिंग प्रशिक्षकासोबतचे छायाचित्र देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

ashwiniponnappain