निवृत्तीचा निर्णय घेणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नसते, माझ्यासाठीही ते सोपे नव्हते.. क्रिकेट सोडण्याचा विचार मी करूच शकत नव्हतो.. निवृत्तीबाबत मी खूप विचार केला, गेल्या वर्षांपासून हा विचार चालूच होता.. पण मन म्हणत होते की, क्रिकेट सोडू नये, पण शरीराने मला साथ दिली नाही.. काही दुखापतींमुळे शरीर मला साथ देत नव्हतं.. अशा परिस्थितीत युवा खेळाडूची जागा अडवण्यापेक्षा आपण निवृत्त झालेलं बरं, हा विचार मी करत निवृत्तीचा निर्णय घेतला. निवृतीचा निर्णय घेताना माझ्या मनात कोणताच खेद नाही. मुंबईसारख्या संघाकडून मला खेळायला मिळाले, त्यानंतर भारतीय संघातही मी खेळलो, त्यामुळे माझ्या मनात निवृत्ती घेताना कोणतेच शल्य नाही. मुंबईच्या संघाने मला बरेच काही दिले आहे, त्याची परतफेड मला कराविशी वाटते, त्यामुळे मुंबईसाठी यापुढे काहीही करायला मी तयार असेन, असे मुंबईचा माजी कर्णधार आणि भारताचा माजी क्रिकेटपटू साईराज बहुतुले पत्रकार परिषदेमध्ये निवृत्तीची घोषणा करताना बोलत होता.
मुंबईकडून खेळताना मला चांगले मित्र मिळाले आणि त्यामुळेच माझी कामगिरी बहरत गेली. सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूने मला बऱ्यादचा मैदानावरच्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचा मला चांगलाच फायदा झाला. भारतीय संघात असताना अनिल कुंबळेसारखा प्रतिस्पर्धी माझ्यासमोर होता, त्याच्याकडूनही मी बरेच काही शिकलो. मफतलाल सराव शिबिराचा मला चांगलाच फायदा झाला, त्यामुळेच मी मुंबईच्या संघात खेळू शकलो. अपघातामुळे मी २० पावले धावेन की नाही याची शंका होती, पण २१ वर्षांची माझी कारकीर्द नक्कीच आनंददायी होती. आता प्रशिक्षण करण्याचा माझा विचार आहे, असे साईराज म्हणाला.