भारतीय संघ २०१९ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाला. विश्वचषक स्पर्धेसाठी संघात निवडलेल्या खेळाडूंवरून सुरुवातीपासूनच निवड समितीवर टीका झाली. विशेषतः अंबाती रायडू सारख्या अनुभवी खेळाडूला वगळून केवळ ५ सामान्यांचा अनुभव असलेल्या विजय शंकरला संघात स्थान दिल्यामुळे निवड प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. याच मुद्द्यावरून नुकतीच भर कार्यक्रमात माजी खेळाडू गौतम गंभीर आणि निवड समितीचे तत्कालीन अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यात जुंपली.

गंभीरचं रोखठोक मत

“कोणत्याही खेळाडूला संघातून वगळण्याआधी त्याला त्याची कल्पना द्यायला हवी. मी, युवराज, रैना, त्रिशतकवीर करून नायर.. आमच्यापैकी कोणालाही विश्वासात घेऊन काहीही सांगितलं गेलं नाही. ते तर राहू दे. ज्या अंबती रायडूला सलग दोन वर्षे तुम्ही संघात चौथ्या क्रमांकासाठी खेळवले, त्याला विश्वचषक स्पर्धेच्या तोंडावर तुम्ही संघातून वगळले. आणि आम्हाला 3D खेळाडू हवा असं कारण देऊन त्याच्या जागी तुम्ही विजय शंकरला संघात घेतलेत. विश्वचषक स्पर्धेच्या संघनिवडीबद्दल बोलताना कोणता निवड समिती अध्यक्ष असं करतो? असं वागणं शोभतं का?”, असा रोखठोक सवाल गंभीरने प्रसाद यांना केला.

एमएसके प्रसादही झाले आक्रमक

आपल्यावर अशाप्रकारे प्रश्न उपस्थित झालेला पाहून प्रसाददेखील आक्रमक झाले. ते म्हणाले, “संघात वरच्या फळीत असलेले रोहित, धवन आणि विराट हे कोणीही गरज पडल्यास गोलंदाजी करण्यास फारसे तयार नव्हते. अशा वेळी चौथ्या क्रमांकावरील खेळाडू हा फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकणारा असावा, असा आमचा संघ निवडताना विचार होता. विजय शंकर याची देशांतर्गत स्पर्धांतील कामगिरी चांगली होती, म्हणूनच त्याला संघात स्थान देण्यात आले होते.”

के श्रीकांत यांनी केला वाद शांत

याच चर्चेत माजी क्रिकेटपटू श्रीकांत देखील सहभागी होते. त्यांनीदेखील यावर मत व्यक्त केले. “माझा गंभीरला पाठिंबाही नाही आणि प्रसादच्या वक्तव्याला विरोधही नाही. पण मला इतकेच वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट यात फरक आहे. तो लक्षात घेऊन संघाची निवड व्हायला हवी”, असे मत व्यक्त करत त्यांनी वाद काहीसा शांत केला.