भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील शेवटचा टप्पा सुरु असून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला ३-१ अशी हार मानावी लागली आहे. या मालिकेतील १ सामना अद्याप बाकी आहे. याच कालावधीत जकार्ता येथे आशियाई क्रीडा स्पर्धा देखील पार पडल्या. या स्पर्धत भारतीयांनी ६९ पदके मिळवून सर्वोत्तम कामगिरी केली. यंदाच्या आशियाई स्पर्धेत पी.व्ही.सिंधू, हिमा दास, स्वप्ना बर्मन, बजरंग पुनिया आणि नीरज चोप्रा आदी खेळाडूनी चांगली कामगिरी केली. पण अद्यापही क्रिकेटलाच अधिक महत्व दिले जाते. यावरून भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर याने नाराजी व्यक्त केली आहे.

‘भारतात क्रिकेटला प्रचंड महत्त्व आहे. क्रिकेट हा भारताचा प्रसिद्ध खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंना प्रत्येक वेळी अधिक महत्व दिले जाते. पण हिरो फक्त क्रिकेटमध्येच नसतात, तर इतर खेळांमध्येही हिरो घडत असतात, असे मत त्याने एका मुलाखतीतून व्यक्त केले आहे.

तो म्हणाला की क्रिकेट हा भारतातील सर्वात आवडता खेळ आहे. पण हिरो हे फक्त क्रिकेटमध्येच नसतात. विशेषतः आशियाई स्पर्धेतील यशानंतर तरी अन्य खेळांनाही आपण समान प्राधान्य द्यायला हवे. त्यामुळे आता अन्य खेळांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे तो म्हणाला. क्रिकेटचे कौतुक पुरे झाले. आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या, असे परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.