जागतिक बुद्धिबळ क्षेत्रातील युवा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन व भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्यात पुन्हा विश्वविजेतेपदाचा महामुकाबला होणार आहे. या लढतीत कोण विजेता होतो, यापेक्षाही ही लढत म्हणजे बुद्धिबळाच्या चाहत्यांसाठी अव्वल दर्जाचे डाव पाहण्याची सुवर्णसंधीच असणार आहे, असे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांनी सांगितले.
विद्यमान विजेता कार्लसन व पाच वेळा विश्वविजेतेपदावर मोहोर नोंदविणारा आनंद यांच्यात ७ नोव्हेंबरपासून रशियातील सोची येथे पुन्हा जगज्जेतेपदासाठी लढत होणार आहे. गतवर्षी चेन्नई येथे कार्लसनकडून विश्वविजेतेपदाची लढत गमावल्यानंतर आनंद याने चॅलेंजर स्पर्धेत अनेक तुल्यबळ खेळाडूंवर मात करीत प्रथम स्थान घेतले. या विजेतेपदामुळे पुन्हा त्याला कार्लसनविरुद्ध विश्वविजेतेपदाची लढत खेळण्याची संधी मिळाली आहे. या आगामी लढतीविषयी गोखले यांच्याशी केलेली खास बातचीत

विश्वविजेतेपदाच्या लढतीत कोणाचे पारडे जड राहील?
बुद्धिबळात वयाच्या मर्यादा नसल्या तरी ऐनवेळी पटावर वेगवेगळय़ा चाली करताना तुमच्या विचारांच्या शैलीला अनन्यसाधारण महत्त्व असते. या शैलीबाबत आनंदपेक्षा कार्लसनचे पारडे जड राहील. चेन्नईतील विजेतेपदानंतर कार्लसनने जलद व ब्लिट्झ विभागातही विश्वविजेतेपदावर मोहोर नोंदविली आहे. आनंदच्या बुद्धिचातुर्याबाबत वयपरत्वे थोडय़ाशा मर्यादा राहात आहेत. त्याचा प्रत्यय चेन्नईत दिसून आला होता. त्याला डावाच्या शेवटी आपल्या चालींवर नियंत्रण ठेवता आले नव्हते. अर्थात, विश्वविजेतेपद मिळविण्यापेक्षाही ते टिकविणे, हे अधिक अवघड मानले जाते. त्यामुळेच कार्लसनपुढे कडवे आव्हान असणार आहे.

चॅलेंजर स्पर्धेतील आनंदच्या कामगिरीविषयी काय सांगता येईल?
कार्लसनविरुद्धच्या विश्वविजेतेपदाची लढत गमावल्यानंतर आनंदचा खेळ संपला अशी टीका झाली होती. मात्र ज्या रीतीने त्याने चॅलेंजर स्पर्धेत अव्वल स्थान मिळविताना जे कौशल्य दाखविले आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्याने पुन्हा भरारी घेतली आहे. चॅलेंजर स्पर्धेत फॅबिआनो कारुआना हा अव्वल दर्जाचा खेळाडू खेळू शकला नव्हता, मात्र आनंदने या स्पर्धेत अनेक वेगवेगळे डावपेच वापरले होते. ते लक्षात घेता त्याने पुन्हा विश्वविजेतेपदाच्या लढतीसाठी चांगली तयारी केल्याचा प्रत्यय आला होता.

आगामी विश्वविजेतेपदाच्या लढतीसाठी आनंदची तयारी कशी झाली असेल?
आनंदविरुद्धच्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत कार्लसनने खूप वेगवेगळय़ा तंत्रांचा व डावपेचांचा उपयोग केला होता. कार्लसनच्या या डावपेचांचा अभ्यास करण्यासाठी आनंदला भरपूर वेळ मिळाला आहे. आनंदने आगामी लढतीसाठी भरपूर गृहपाठ केलेला असणार आहे. चेन्नईतील लढतीच्या वेळी आनंदवर थोडेसे मानसिक दडपण होते. घरच्या मैदानावर ही लढत झाली होती. त्यामुळे तमाम भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे आनंदवर होते. या अप्रत्यक्ष मानसिक दडपणाखाली आनंदला ही लढत गमवावी लागली होती. आता मात्र परदेशात ही लढत होत आहे. परदेशातील लढतीत आनंद नेहमीच सर्वोच्च कौशल्य दाखवत खेळतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. सोची येथील लढतीच्या वेळी त्याच्यावर कोणतेही दडपण असणार नाही.

आनंदच्या तुलनेत कार्लसनकडे विजेतेपदासाठी कोणते महत्त्वाचे गुण आहेत?
आनंदपेक्षा कार्लसनकडे ऊर्जा खूप अधिक आहे. जेवढा डाव लांबत जाईल, तेवढी त्याची ताकद वाढत जाते. डावाच्या शेवटच्या कौशल्यात कार्लसन हा माहीर मानला जातो. आनंद हा संयमाचा महामेरू मानला जात असला तरी कार्लसन हा संयमाबाबत त्याच्या एक पाऊल पुढे आहे. खेळाच्या प्रत्येक विभागात त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अर्थात, आनंदने यंदा त्याच्याविरुद्ध विजय मिळविला होता. विश्वविजेतेपदानंतर कार्लसन प्रथमच आनंदविरुद्ध एका सामन्यात पराभूत झाला आहे. कार्लसनही आगामी लढतीसाठी खूप चांगली तयारी केली असणार आहे.

आनंदने गतवेळी पराभव स्वीकारल्यानंतर त्याचा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रावर अनिष्ट परिणाम होणार अशी टीका झाली होती, त्याबाबत काय सांगता येईल?
आनंदने गतवेळी जरी ही लढत गमावली होती, तरीही या खेळाची लोकप्रियता कमी झालेली नाही. आता तर अनेक लोक फावल्या वेळेत इंटरनेटच्या माध्यमाचा उपयोग करीत या खेळाचा आनंद घेताना दिसतात. आगामी लढतही हे लोक पुन्हा आवर्जून पाहतील व विविध डावपेचांचा आस्वाद घेतील अशी मला खात्री आहे.