२०१८-१९ वर्षांसाठी राज्य सरकारच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता गेट वे ऑफ इंडिया परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सर्व पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कुस्ती क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पंढरीनाथ तथा अण्णासाहेब पठारे यांना जीवन गौरव तर बाळासाहेब आवारे यांना कुस्तीसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा थेट पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. याचसोबत क्रीडापटूंमध्ये पुण्याच्या अभिजित कटकेचीही क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.

याव्यतिरीक्त प्रो-कबड्डीत महाराष्ट्राचा झेंडा उंचावणाऱ्या गिरीश एर्नाक आणि रिशांक देवाडीगा यांचीही छत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. महिलांमध्ये मुंबई शहराकडून खेळणाऱ्या सोनाली शिंगटेची निवड झालेली आहे. याचसोबत हॉकीमध्ये भारतीय संघाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केलेल्या यवतमाळच्या आकाश चिकटेचाही या मानाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. याव्यतिरीक्त केंद्र सरकारच्या खेलो इंडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या राज्याच्या खेळाडूंचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.