05 April 2020

News Flash

निखळ.. निस्सीम!

रॉजर फेडरर.. राफेल नदाल.. या तेरा अक्षरांमध्ये तब्बल ३१ ग्रँड स्लॅम जेतेपदे सामावलेली आहेत.

रॉजर फेडरर.. राफेल नदाल.. या तेरा अक्षरांमध्ये तब्बल ३१ ग्रँड स्लॅम जेतेपदे सामावलेली आहेत. खेळाप्रती अत्युच्य निष्ठा, सर्वोत्तमाचा ध्यास, जिंकण्याची अविरत उर्मी, अचंबित करणारे सातत्य ही गुणवैशिष्टय़े अंगीकारलेले दिग्गज एकमेकांसमोर उभे ठाकतात तो क्षण निखळ, निस्सीम आनंदाचा परमोच्च बिंदू असतो. इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगच्या निमित्ताने इंदिरा गांधी स्टेडियमवर उपस्थित दहा हजारांपेक्षा अधिक चाहत्यांनी शनिवारी तीन वेळा तो ‘बिंदूक्षण’ अनुभवला. या लढतीच्या कवित्वातही इंडियन एसेसने युएई रॉयल्सवर ३०-१९ असा विजय मिळवताना निर्विवाद वर्चस्व राखले.
थेट प्रक्षेपण सुरू होण्यापूर्वी रॉजर फेडरर सरावासाठी कोर्टवर अवतरला आणि स्टेडियमवर जल्लोष झाला. १५ मिनिटांनंतर राफेल नदालचे आगमन झाले आणि उधाणाची तीव्रता वाढली. राफेलचे आगमन होताच रॉजर थांबला, नदाल पुढे आला. असंख्य मुकाबल्यात शेरास-सव्वाशेर ठरलेल्या या योद्धांच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची लकेर उमटली. दोघांनी एकमेकांना हलकेच आलिंगन दिले आणि स्टेडियममध्ये क्षणभर शांतता पसरली. काहीतरी विलक्षण पाहिल्याचे लक्षात आल्यानंतर टेनिसरसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जिंकणे, विजेतेपदे वैर-कटूता आणतात, हा समज खोडून काढत खेळ मने जोडतात, हा संदेश या दोघांच्या छोटय़ा कृतीने दिला.
एकेरीचे विशेषज्ञ असलेले हे दोघे पुरुष दुहेरीच्या निमित्ताने कोर्टवर उतरले व पुन्हा एकदा दोघांच्या नावाने स्टेडियमचा परिसर दणाणून गेला. फेडररचा सहकारी मारिन चिलीच, तर नदालचा रोहन बोपण्णा. या दोघांचेही अस्तित्व नाममात्र. स्टेडियमच्या एका भागातून ‘राफा, राफा’चा जयघोष तर पुढच्याच क्षणी दुसऱ्या टोकाकडून ‘फेडरर, फेडरर’चा नारा. आपापल्या युवा सहकाऱ्यांच्या ऊर्जेला साजेसा खेळ करत या दोघांनी महानतेची प्रचीती दिली. बोपण्णाच्या साथीने नदालने फेडरर-चिलीच जोडीला निष्प्रभ केले.
आयपीटीएलच्या दुसऱ्या हंगामातील बहुचर्चित लढतीत ते दोघे समोरासमोर आले आणि खऱ्या अर्थाने टाळ्या, शिटय़ा, जयघोषाचा जागर झाला. हारजीतपेक्षाही अव्वल दर्जाच्या प्रदर्शनाला चाहत्यांनी पुरेपूर साथ दिली. फेडररचा ठेवणीतला एकहाती बॅकहँड, लवचिकतेची कसोटी पाहणारा ड्रॉपचा फटका तर दुसरीकडे नदालचा ताकदवान फोरहँड, खणखणीत सव्‍‌र्हिस यांनी एकमेकांना आव्हान दिले. घरचा संघ असल्याने इंडियन एसेसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नदालला पाठिंबा साहजिकच होता. मात्र पलीकडच्या बाजूला असलेल्या दिग्गजालाही चाहत्यांनी मनापासून अभिवादन केले. नदालने २-१ अशी आघाडी घेतली. मात्र फेडररने २-२ अशी बरोबरी साधली. मग नदालने ५-३ अशी आघाडी मिळवत आगेकूच केली. मात्र फेडररने नेहमीच्या शैलीत पुनरागमन करत सव्‍‌र्हिस राखली आणि त्यानंतर नदालची सव्‍‌र्हिस भेदत ५-५ बरोबरी केली. ग्रँड स्लॅम द्वंद्वाची पर्वणी शूटआऊटमध्ये गेली. तिथेही नदालने ३-१ आघाडी मिळवली. फेडररने पुन्हा चिवटपणे झुंज देत ४-५ अशी पिछाडी भरून काढली. त्यानंतर नदालने एक गुण कमावत संघाच्या निर्विवाद विजयावर शिक्कामोर्तब केले.
सामना संपल्यानंतर दोघांनी हस्तांदोलन केले आणि अद्भुत अशा चिरंतर आठवणींसह चाहत्यांनी तृप्त मनाने निरोप घेतला. घरच्या मैदानावर विजयाची हॅट्ट्कि नोंदवताना इंडियन एसेसने युएई रॉयल्स संघावर ३०-१९ असा विजय मिळवला.
सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा जोडीने क्रिस्तिना लाडेनोव्हिक-डॅनियल नेस्टर जोडीवर ६-४ अशी मात केली. अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काने लाडेनोव्हिकचा ६-१ असा धुव्वा उडवला. अफलातून खेळाचे प्रदर्शन करत फॅब्रिस सँटोरोने गोरान इव्हानिसेव्हिकला ६-५ असे नमवले. तत्पूर्वी, झालेल्या अटीतटीच्या लढतीत सिंगापूर स्लॅमर्सने जपान वॉरियर्सला २४-२२ असे नमवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 7:59 am

Web Title: grand slam tournament roger fedrar
टॅग Grand Slam
Next Stories
1 कोलकाता मिनी मॅरेथॉनमध्ये जैशा, ललिता व सुधा सहभागी
2 विश्वनाथन आनंदचा धक्कादायक पराभव
3 रिओ ऑलिम्पिकसाठी सानिया-बोपण्णा एकत्र?
Just Now!
X