News Flash

आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धा: हीना सिधूचा सुवर्णवेध!

भारताच्या हीना सिधूने येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पध्रेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.

श्वेता सिंगला रौप्यपदक; महाराष्ट्राच्या श्रेया गावंडेला कांस्य

भारताच्या हीना सिधूने येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पध्रेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. याच गटात श्वेता सिंगने रौप्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. कोरियाच्या सिओन ए किमला कांस्यवर समाधान मानावे लागले. महिला १० मीटर एअर पिस्तूल कनिष्ठ गटात महाराष्ट्राच्या श्रेया गावंडेने कांस्यपदकाची कमाई केली.
पात्रता फेरीत ३८७ गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या माजी विश्वविजेत्या हीनाने अंतिम फेरीत १९७.८ गुणांची कमाई केली, तर श्वेता आणि किम यांना अनुक्रमे १९७.० व १७५.८ गुण मिळवण्यात यश आले. या दोन भारतीय खेळाडूंमध्ये युवा नेमबाज यशस्विनी सिंग देश्वालनेही अंतिम फेरीत प्रवेश करून आपली छाप सोडली, परंतु तिला १५५.३ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या खात्यात एकूण १७ पदके जमा झाली आहेत. त्यात सहा सुवर्ण, पाच रौप्य व सहा कांस्यपदकांचा समावेश आहे.
१० मीटर एअर पिस्तूल प्रकारात हीनाने १०.७ गुणांची कमाई करून दमदार सुरुवात केली, परंतु श्वेताने पहिल्या तीनपैकी दोन प्रयत्नांत दहा गुणांची कमाई करून आघाडी घेतली. पुढील तीन प्रयत्नांत सातत्यपूर्ण खेळ करून श्वेताने ६१.३ गुणांसह ही आघाडी कायम राखली होती. त्यापाठोपाठ ६०.७ गुणांसह हीना दुसऱ्या स्थानावर होती. इराणची एल्हॅम हरीजानी हिला बाद ठरवण्यात आल्यानंतर हीनाला सूर गवसला. तिने त्यानंतर मागे वळून न पाहता दमदार आघाडी घेतली. महिला १० मीटर एअर पिस्तूल कनिष्ठ गटात निवेथा श्री प्ररमानंथम, गौरी शेओरॅन आणि श्रेया गावंडे यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक पटकावले. १० मीटर पिस्तूल युवा गटात भारताच्या हर्षदा निथावेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सांघिक प्रकारात हर्षदाने मलाईका गोएल आणि नयनी भारद्वाजसह सुवर्णपदक जिंकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2015 1:41 am

Web Title: heena sidhu gold in asian air gun championship
टॅग : Heena Sidhu
Next Stories
1 हरयाणाविरुद्ध पराभवाची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक
2 रणजी जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी मुंबई सज्ज
3 बीसीसीआयची दिल्लीच्या २२ क्रिकेटपटूंवर बंदी
Just Now!
X