|| मिलिंद ढमढेरे

फिनलंडमधील टॅम्पेरे येथे भारताचा तिरंगा ध्वज उंचावत असताना १८ वर्षांच्या युवतीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहात होते. तिच्या या क्षणाची चित्रफीत व छायाचित्रे शेकडो चाहत्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली. भारतासाठी हा सोनेरी क्षण दिला, तो हिमा दासने. तिने २० वर्षांखालील गटाच्या जागतिक स्पर्धेत ४०० मीटर धावण्याची शर्यत जिंकून इतिहास घडवला.

हिमाने मिळविलेले हे यश खरोखरीच सर्वासाठी अभिमानास्पद आहे. अ‍ॅथलेटिक्स हा खेळांचा राजा मानला जातो व जागतिक स्तरावर पदकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडा प्रकार म्हणून त्याची ओळख आहे. परंतु सव्वाशे कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारताला जागतिक स्तरावर अ‍ॅथलेटिक्समध्ये जेमतेम चारच पदकांवर समाधान मानावे लागले आहे. यापूर्वी नीरज चोप्राने २०१६ मध्ये वरिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेतील थाळीफेक या क्रीडा प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती. सीमा पुनियाने २००२ मध्ये तर नवजित कौरने २०१४च्या जागतिक स्पर्धेतील थाळीफेकमध्येच कांस्यपदक मिळवले होते. या पदकांचा अपवाद वगळता आजपर्यंत अनेक वेळा मोठे पथक पाठवूनही भारताला जागतिक व ऑलिम्पिक स्पर्धामध्ये रिक्त हस्ते परतावे लागले आहे. आजपर्यंत फेकी, धावणे व उडय़ांच्या प्रकारांसाठी परदेशी प्रशिक्षक नियुक्त करूनही भारतीय खेळाडूंची स्वत:च्या वैयक्तिक कामगिरीपेक्षाही निराशाजनक कामगिरी झाली आहे. अन्य खेळांच्या तुलनेत भारतीय धावपटूंना भरपूर सुविधा व सवलती मिळतात, मात्र जागतिक किंवा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी असलेल्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे ते सातत्याने अपयशी ठरले आहेत.

आपल्या देशातील ग्रामीण भागात अ‍ॅथलेटिक्सकरिता विपुल नैपुण्य आहे, मात्र त्यांच्याकडे अपेक्षेइतके लक्ष दिले जात नाही. ‘भारताची सुवर्णकन्या’ म्हणून ओळख असलेली पी. टी. उषा हीदेखील केरळमधील पायोली या ग्रामीण भागातून तयार झालेली खेळाडू आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण द्यायचे झाल्यास कविता राऊत, ललिता बाबर यांच्यासारख्या खेळाडूही खेडेगावातूनच तयार झाल्या आहेत. हिमा दास ही आसाममधील एका खेडेगावातील खेळाडू. अ‍ॅथलेटिक्समध्ये आपण कारकीर्द घडवू, असे तिला कधी वाटले नव्हते. गावातील अन्य मुलांसमवेत फुटबॉल व क्रिकेट खेळण्याचा ती मनसोक्त आनंद घेत असे. हे खेळ खेळताना तिच्याकडील धावण्याची शैली तिच्या शालेय शिक्षकांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी तिला अ‍ॅथलेटिक्सचा सराव करण्याचा सल्ला दिला. गुवाहाटी येथे असलेल्या अकादमीत तिला सराव करावा लागणार होता. गावापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरात तिला ठेवण्यास पालकांचा सुरुवातीला विरोध झाला नाही तरच नवल. परंतु तिचे प्रशिक्षक निपोन दास यांनी तिच्याकडे वेगवान धावण्याचे कौशल्य आहे व ती जागतिक स्तरावर कीर्ती मिळवेल असे तिच्या पालकांना पटवून दिले. त्यामुळेच भारताला जागतिक धावपटू लाभली.

हिमा ही सुरुवातीला १०० व २०० मीटर धावण्याच्या शर्यतीचा सराव करीत असे. मात्र ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ती जास्त चमकू शकेल, हे ओळखूनच निपोन यांनी तिला त्या सरावावर लक्ष केंद्रित करण्याबाबत सुचवले. हिमाला पदक मिळवण्यापेक्षा आपल्या वेळेच्या कामगिरीत कशी सुधारणा होईल, हे अधिक महत्त्वाचे वाटते. आपल्याला अन्य मुलींबरोबर अपेक्षित अशी वेगाची शर्यत करता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर ती अकादमीतील मुलांबरोबरच सराव करण्यास प्राधान्य देत असते. त्यामुळे प्रत्येक वेळी तिच्या कामगिरीत सुधारणा होत असते. फिनलंड येथील जागतिक स्पर्धेत तिला अन्य परदेशी धावपटूंचे आव्हान होते. अन्य अनुभवी खेळाडूंशी शर्यत करताना तिने शेवटच्या ५० मीटर अंतरात घेतलेला वेग हा अ‍ॅथलेटिक्स पंडितांनाही थक्क करणारा होता. शर्यतीच्या सुरुवातीस, मधल्या टप्प्यात कसा वेग ठेवायचा व शेवटच्या टप्प्यात कशी जोरदार मुसंडी मारायची, याबाबत तिने दाखवलेले कौशल्य अतुलनीय आहे.

मुळातच अ‍ॅथलेटिक्समधील जागतिक पदके म्हणजे भारतासाठी मृगजळच असते. हिमाने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेबाबत आशा निर्माण केल्या आहेत. २०२०च्या ऑलिम्पिकसाठी आतापासूनच अ‍ॅथलेटिक्स संघटकांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तिच्याबरोबरच अनेक नैपुण्यवान युवा खेळाडू आहेत. योग्य प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अधिकाधिक अनुभव, पोषक आहार व तंदुरुस्ती याबाबत या खेळाडूंची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा, पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये आपल्या खेळाडूंना रिकाम्या हातानेच परतावे लागेल.

बूंदसे गयी..

हिमाने सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिचे कौतुक करण्याऐवजी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी तिला बोलता येत नव्हते, इंग्रजी बोलताना व्याकरणाच्या चुका करीत होती, यावरच समाजमाध्यमाद्वारे प्रतिक्रिया दिली. धनुष्यातून बाण सुटल्यानंतर तो परत येत नाही व आपले लक्ष्य तो साधतो. महासंघाने दिलेल्या या प्रतिक्रियेवर असंख्य चाहत्यांनी कडवट टीका केल्यानंतर महासंघाने दिलगिरी व्यक्त केली, मात्र तोपर्यंत महासंघाच्या या वर्तनाचे सपशेल हसू झाले होते.

milind.dhamdhere@expressindia.com