हिमाचल प्रदेशची आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्रियांका नेगीचा सवाल

मुंबई : हिमाचल प्रदेशात आम्ही जन्मलो आहोत. राज्याने मला खेळाडू म्हणून पोलीस उपनिरीक्षकाची नोकरी देऊन पोटापाण्याचा प्रश्न सोडवला आहे. मग मी राज्याकडूनच खेळायला हवे ना, रेल्वेतून का खेळू, असा सवाल राष्ट्रीय उपविजेत्या हिमाचल प्रदेशच्या संघातील आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्रियांका नेगीने केला.

हिमाचल प्रदेशच्या महिला संघाने २०१७ मध्ये भारतीय रेल्वेला हरवून वरिष्ठ राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर प्रियांकासह संघातील बहुतांशी खेळाडूंना रेल्वेत सामील होण्याचे प्रस्ताव आले होते. यासंदर्भात प्रियांका म्हणाली, ‘‘मी आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली, तेव्हापासूनच मलाही रेल्वेचे प्रस्ताव येत गेले. सुरुवातीच्या काळात राज्यात नोकऱ्यांचे अधिष्ठान नव्हते, तेव्हा रितू नेगीने रेल्वेची नोकरी पत्करली. हा अपवाद वगळता बाकी हिमाचलच्या सर्वच खेळाडूंनी रेल्वेकडून खेळणे नाकारले आहे; पण गेल्या काही वर्षांत हिमाचलमध्ये खेळाडूंना प्रथम श्रेणी दर्जाच्या नोकऱ्यासुद्धा मिळत आहेत. त्यामुळे वातावरण कमालीचे बदलले आहे. आता अजय ठाकूर हा पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहे, तर कविता ठाकूरसुद्धा लवकरच सरकारी नोकरीत रुजू होईल.’’

विलासपूरच्या क्रीडा निवासी आश्रमातील प्रशिक्षणामुळे प्रियांकाची कबड्डीमधील कारकीर्द घडली. प्रियांकाने सहा वेळा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात २०१२च्या विश्वचषक स्पर्धेचा आणि २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा समावेश आहे. २००८च्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत हिमाचलने प्रथमच कांस्यपदक जिंकले. तेव्हापासून राष्ट्रीय स्पर्धेत हिमाचलची दखल घेणे अन्य संघांना भाग पडले. २०१८मध्ये फेडरेशन चषक स्पर्धेत हा संघ रेल्वेकडून दोन गुणांनी हरला. मग मागील राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हरयाणाने हिमाचलचे आव्हान संपुष्टात आणले. हिमाचलच्या संघटकांची भूमिकासुद्धा या यशात महत्त्वाची असल्याचे प्रियांकाने सांगितले.

‘‘हिमाचलमधील वातावरण अत्यंत थंड असल्यामुळे सरावावरसुद्धा आमच्या परिणाम होतो. त्यामुळे शिबिरेसुद्धा पायथ्याच्या परिसरात कमी थंड वातावरणात घेतली जातात, कारण डोंगराळ परिसर इथे अधिक आहे. तिथे शिबिरे घेणे किंवा सराव करणे कठीण असते. शिबिरांचे नियोजन करताना संघाला कोणत्या परिसरात खेळायला जायचे आहे, याचीसुद्धा काळजी घेतली जाते,’’ असे प्रियांका म्हणाली.

निवासी क्रीडा आश्रमांमुळे हिमाचलला यश!

विलासपूर आणि धरमशाला येथे सुरू झालेल्या क्रीडा निवासी आश्रमांमुळे हिमाचल प्रदेशला कबड्डीमध्ये यश मिळते आहे, असे प्रियांकाने सांगितले. ‘‘२००५ मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) राज्यात निवासी क्रीडा आश्रम सुरू केले. मग वर्षभरात राज्य शासनानेही निवासी क्रीडा आश्रम सुरू केले. २००७ पासून हिमाचलच्या वैभवशाली अध्यायाला प्रारंभ झाला. त्या वेळी हरिद्वारला झालेल्या कुमारी गटाच्या स्पर्धेत आम्ही प्रथमच सुवर्णपदक जिंकले होते. आता किशोरी, कुमारी, वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा असो किंवा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा असो, हिमाचलचे कबड्डीपटू हमखास पदके जिंकत आहेत,’’ असे प्रियांकाने आत्मविश्वासाने सांगितले.