चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताला हातात आलेल्या विजयावर पाणी सोडावं लागलं आहे. सामना संपायला अखेरचा दीड मिनीट शिल्लक असताना बेल्जियमने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन सामन्यात बरोबरी साधली. भारताकडून पी. आर. श्रीजेश आणि बचावपटीने भक्कम बचाव करत बेल्जियमच्या खेळाडूंची सर्व आक्रमण परतावून लावली. मात्र अखेरच्या काही मिनीटांमध्ये आपला गोलपोस्ट सुरक्षित ठेवणं भारताला जमलं नाही. बेल्जियमकडून लुयपार्टने ५९ व्या मिनीटाला आपल्या संघाला बरोबरी साधून दिली.

सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघाने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. जागतिक क्रमवारीत बेल्जियमसचा संघ भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहे, मात्र आजच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शिस्तबद्ध खेळाचं प्रदर्शन करत बेल्जियमच्या खेळाडूंना पुरत कोंडीत पकडलं. मनदीप सिंह, एस. व्ही. सुनील यांनी पहिल्या सत्रात भारताला पेनल्टी कॉर्नरच्या चांगल्या संधी निर्माण करुन दिला. १० व्या मिनीटाला हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नवर गोल करुन भारताला १-० अशी आघाडीही मिळवून दिली.

या आघाडीनंतर बेल्जियमचा संघ सामन्यात आक्रमक झाला. मात्र भारतीय संघाचा कर्णधार आणि गोलकिपर पी. आर. श्रीजेशने भारतीय गोलपोस्टचं भक्कम संरक्षण केलं. जॉन जॉन डोमेन आणि अन्य बेल्जियम खेळाडूंची सर्व आक्रमण भारतीय बचावफळीने थोपवून धरली. सामन्यात अखेरच्या सत्रापर्यंत भारताने सामन्यात १-० अशी आघाडी कायम ठेवली होती. त्यामुळे हा सामना भारत जिंकणार अस वाटत असतानाच, अखेरच्या मिनीटांमध्ये बेल्जियमच्या खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नरची कमाई केली. मात्र यावेळी बेल्जियमचं आक्रमण थोपवण श्रीजेशला जमलं नाही. ५९ व्या मिनीटाला लुयपार्टने बेल्जियमला बरोबरी साधून दिली. उद्या या स्पर्धेत भारताचा सामना नेदरलँडशी होणार आहे.