टोक्यो ऑलिम्पिक सराव स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

नवी दिल्ली : टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकआधीच्या सराव स्पर्धेकरिता भारतीय महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आला आहे. सुनीता लाकरा आणि ज्योती या अनुभवी खेळाडूंना संघातून वगळ्यात आले असून युवा खेळाडू शर्मिला देवी आणि रीना खोखार यांना संधी देण्यात आली आहे.

हिरोशिमा येथे झालेल्या एफआयएच महिला सीरिज फायनल्स हॉकी स्पर्धेसाठी निवडलेला संघच कायम ठेवण्यात आला असून फक्त हे दोन बदल करण्यात आले आहेत. रीनाला दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले होते. मात्र तिने संघात पुनरागमन केले असून शर्मिला राष्ट्रीय संघाकडून पदार्पण करणार आहे.

आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडेच संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून गोलरक्षक सविता हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल. भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असून त्यांना दुसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया, चीन (११वे स्थान) आणि यजमान जपान (१४वे स्थान) यांसारख्या खडतर प्रतिस्पध्र्याचा सामना करावा लागणार आहे.

भारतीय महिला संघ

गोलरक्षक : सविता, रजनी इथिमार्पू. बचावपटू : दीप ग्रेस इक्का, रीना खोखार, गुरजित कौर, सलिमा टेटे, निशा. मधली फळी : सुशीला चानू, निक्की प्रधान, मोनिका, लिलिमा मिंझ, नेहा गोयल. आघाडीवीर : राणी रामपाल (कर्णधार), नवनीत कौर, वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवज्योत कौर, शर्मिला देवी.