04 June 2020

News Flash

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कौशिक

ओल्ट्समन्स यांना साहाय्य करणार माजी ऑलिम्पिकपटू महाराज कृष्णन कौशिक यांच्याकडे भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून भारतीय हॉकीचे उच्च कामगिरी संचालक रोलॅन्ट ओट्समन यांना

| July 11, 2013 01:47 am

ओल्ट्समन्स यांना साहाय्य करणार
माजी ऑलिम्पिकपटू महाराज कृष्णन कौशिक यांच्याकडे भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून भारतीय हॉकीचे उच्च कामगिरी संचालक रोलॅन्ट ओट्समन यांना ते साहाय्यक म्हणून काम करतील. संघाचे मुख्य प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांना मंगळवारी त्यांच्या पदावरून डच्चू देण्यात आला होता.
मॉस्को येथे १९८० मध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघाचे कौशिक यांनी प्रतिनिधित्व केले होते. ओल्ट्समन्स यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांना कौशिक मदत करतील. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मंगळवारी नॉब्स यांच्याशी केलेला करार रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र आपली हकालपट्टी झाली नसून प्रकृतीच्या कारणास्तव आपणच या पदाचा राजीनामा दिला असल्याचे नॉब्स यांनी सांगितले होते.
बंगळुरु येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय हॉकी शिबिरात १६ जुलै रोजी कौशिक रुजू होतील. इपोह (मलेशिया) येथे २४ ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा होत असून ही स्पर्धा कौशिक यांच्याकरिता पहिली कसोटी असेल. ही स्पर्धा जागतिक स्पर्धेसाठी पात्रता फेरी असल्यामुळे भारतीय संघाकरिता त्यास अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविणे ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. मी वेगवेगळ्या खेळांडूंबरोबर यापूर्वी प्रशिक्षक म्हणून काम केले असल्यामुळे तो अनुभव मला माझ्या नवीन जबाबदारीसाठी उपयुक्त ठरणार आहे. संघ व्यवस्थापनाबरोबर मी सविस्तर चर्चा करणार असून भारतीय संघ नेमका कोठे कमी पडतो याबाबत माहिती मिळविणार आहे.
इपोह येथील स्पर्धा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे थोडेसे दडपण आहेच. प्रशिक्षकपद म्हणजे सतत डोक्यावर टांगती तलवार असते. ही जबाबदारी मी यशस्वी रीत्या पार पाडेन, असा आत्मविश्वासही कौशिक यांनी व्यक्त केला.

आधुनिक हॉकीसाठी भारतीय प्रशिक्षक अयोग्य : चार्ल्सवर्थ
नवी दिल्ली :  आधुनिक हॉकीचा विचार करता भारतीय हॉकी संघासाठी स्थानिक प्रशिक्षक फारसे चांगले नाहीत. त्यांच्याकरिता परदेशी  प्रशिक्षकच योग्य असे सांगत ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू रिक चार्ल्सवर्थ यांनी भारतीय हॉकी संघटकांवर कडाडून टीका केली आहे. भारतीय हॉकी संघाचे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या जागी एम. के. कौशिक या भारतीय प्रशिक्षकांना पाचारण करण्यात आले आहे. त्याबाबत टीका करीत चार्ल्सवर्थ म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉकीत जे काही बदल होत आहेत, त्या बदलांना सामोरे जाण्याची क्षमता भारतीय प्रशिक्षकांकडे नाही. मी स्वत: भारतीय संघटक व प्रशिक्षकांबरोबर काम केल्याने मला त्यांची क्षमता माहीत आहे. नॉब्स यांच्या अगोदर भारतीय संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून होजे ब्रासा (स्पेन), चार्ल्सवर्थ (ऑस्ट्रेलिया) व गेऱ्हार्ड रॅच (जर्मनी) या परदेशी प्रशिक्षकांनी काम केले आहे. चार्ल्सवर्थ पुढे म्हणाले, जर ओल्ट्समन व नॉब्स यांच्यातील एकाची निवड करण्याचे मला सांगितले असते तर मी ओल्ट्समन यांना प्राधान्य दिले असते. कारण त्यांच्याकडे जास्त अनुभव आहे. नॉब्स यांची कशी निवड केली होती याचेच मला आश्चर्य वाटत आहे. जर त्यांच्याकडे प्रशिक्षकाची जबाबदारी दिली होती तर त्यांना पूर्ण सहकार्य मिळणे आवश्यक होते मात्र तसे सहकार्य त्यांना मिळाले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2013 1:47 am

Web Title: hockey india appoint krishan kaushik as coach
टॅग Hockey,Hockey India,Sai
Next Stories
1 सुवर्णपदकाचा आनंद साजरा करायला वेळ नाही!
2 आज लंकादहन?
3 आयर्लंड २०१५ विश्वचषकासाठी पात्र
Just Now!
X